Raj Thackeray Aamir Khan Gauri Spratt Wedding : बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि गौरी स्प्रॅट हे आता विवाहबंधनात अडकले आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी त्याचे लग्न पार पडले आहे. केवळ कुटुंबीय आणि त्यांच्या खास मित्रांच्या उपस्थितीमध्ये हा खासगी विवाहसोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे या खास वेळी आमिर खानची सर्व मुले उपस्थित होती. आमिर खानचे हे तिसरे लग्न असून, त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आमिर खानच्या घरी भेट देऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आमिर खान हा तिसऱ्यांदा लग्नबंधनामध्ये अडकला असून, त्याने गर्लफ्रेंड गौरीशी लग्न केले आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने ‘स्क्रीन’ला दिलेल्या माहितीनुसार, आमिर व गौरी हे आता अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले आहेत. या समारंभापूर्वी इरा खान आणि जुनैद खान ही आमिरची मुलं लग्नासाठी निवासस्थानी दाखल होताना दिसली. तसेच आमिरचा जुना मित्र आणि ‘लगान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह अभिनेत्री एली अवरामही या खासगी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमिर खानला त्याच्या घरी भेट देत विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे हे आमिर खानच्या घरी दाखल

व्हायरल भयानी या पापाराझीने सोशल मीडिया अकाउंटवरून राज ठाकरे हे आमिरच्या घरी उपस्थित राहिल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या निवासस्थानी राज ठाकरे स्वतः उपस्थित राहिले असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. यावेळी ते लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देऊन आमिरचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आमिरच्या निवासस्थानीच विवाहसोहळा पार पडल्यामुळे राज ठाकरे त्याला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

लग्नानिमित्त आमिरच्या घराला आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही लग्नाच्या तयारीला वेग आला होता. घर सजवण्यापासून पाहुण्यांच्या सोईसाठी आवश्यक फर्निचर आणण्यापर्यंतची सर्व तयारी सुरू असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आमिरच्या घरासमोर खास मांडव उभारण्यात आला होता आणि जोरदार तयारी करण्यात आली आहे.

आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याबरोबर झाले होते. १९८६ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी आमिर फक्त २१ वर्षांचा होता. त्यांना इरा खान व जुनैद खान, अशी दोन मुले आहेत. लग्नाच्या १६ वर्षांनंतर आमिर व रीना वेगळे झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी २००५ साली लग्न केले. मात्र, २०२१ मध्ये किरण व आमिर यांनी विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. आमिर व किरण यांना आझाद राव खान असा मुलगा आहे. त्यानंतर आता आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. गौरी स्प्रॅट हिच्यासह आमिर खानचे तिसरे लग्न झाले आहे.