Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Teaser : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपट येत्या १ मे रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रितेश या चित्रपटासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतंय. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेशने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. आता या सिनेमाची पहिली झलक टीझरच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘धुरंधर २’च्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर पाहायला मिळतो.

१ मे २०२६ रोजी ( महाराष्ट्र दिन ) हा सिनेमा एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. दमदार संवाद, हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती याची झलक प्रेक्षकांना या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. याशिवाय ‘राजा शिवाजी’मध्ये कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत झळकणार आहेत हे सुद्धा या टीझरच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे.

संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे. रितेश देशमुख यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याचा पहिला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. टीझरमध्ये रितेशला महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर प्रेक्षक एकच जल्लोष करताना दिसत आहेत. तर, त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमातील जिनिलीयाचा मराठमोळा लूक, तिचे संवाद टीझरमध्ये लक्ष वेधून घेतात. तर, शहाजीराजे भोसलेंच्या भूमिकेत अभिनेते महेश मांजरेकर आणि राजमाता जिजाऊंची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री साकारणार आहे. याशिवाय अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. टीझरच्या शेवटी बॅकग्राऊंडला वाजणारं “छत्रपती” गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेतं. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं संगीत प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने स्वत: केलं असून, याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी केली आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.