Ek Din box office collection day 1: बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान ज्या चित्रपटाचा व्हिडिओ पाहून भावूक झाला होता, तो ‘एक दिन’ (Ek Din) चित्रपट अखेर १ मे रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाला. सुनील पांडे दिग्दर्शित या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र पहिल्या दिवसाची आकडेवारी पाहता हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमासमोर रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने जास्त कमाई करत बाजी मारली आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, ‘एक दिन’ चित्रपटाने पहिल्या दिवशी साधारण १.१५ कोटी रुपये कमावले. १९६१ शो असूनही प्रेक्षकांची ऑक्युपन्सी फक्त १४.३% होती. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग रिलीजच्या तीन आठवड्यांपूर्वीच सुरू करण्यात आले होते, पण त्याचा फायदा झाला नाही.

हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासमोर ‘राजा शिवाजी’शिवाय इतर कोणत्याही मोठ्या सिनेमाचे आव्हान नव्हते. ‘राजा शिवाजी’ हिंदीसह मराठीत रिलीज झाला. ‘एक दिन’च्या एकूण कलेक्शनपेक्षा ‘राजा शिवाजी’च्या हिंदी व्हर्जनने जास्त कमाई केली. ‘राजा शिवाजी’ने हिंदीत ३ कोटींचे कलेक्शन केले.

जुनैद खान व साई पल्लवीची जादू फिकी

‘एक दिन’ हा दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. दक्षिण भारतात तिची मोठी फॅन फॉलोइंग असली, तरी उत्तर भारतात ती फार लोकप्रिय नाही. कदाचित त्यामुळेच हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची फारशी क्रेझ दिसली नसावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान अजूनही चित्रपटसृष्टीत फार यश मिळवू शकलेला नाही. त्याचा पहिला चित्रपट ‘महाराज’ थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये जयदीप अहलावतच्या अभिनयाचं कौतुक झालं, पण जुनैद प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नव्हता. त्याचा दुसरा चित्रपट ‘लव्हयापा’ देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटाने केवळ १.१५ कोटींची ओपनिंग केली होती आणि एका आठवड्यातच तो बॉक्स ऑफिसवरून गायब झाला होता.

‘एक दिन’ची सुरुवात अत्यंत संथ झाल्यामुळे, आता सर्वांचे लक्ष शनिवार-रविवारच्या कमाईवर आहे. जर या दोन दिवसांत चित्रपटाने वेग घेतला नाही, तर तो लवकरच बॉक्स ऑफिसवरून गायब होईल. दुसरीकडे, अक्षय कुमारचा अलिकडेच प्रदर्शित झालेला भूत बंगला चित्रपट अजूनही चांगली कमाई करतोय. त्याने शुक्रवारी ४.५ कोटींची कमाई केली. यासह या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई १३२.६५ कोटींवर पोहोचली आहे. ‘धुरंधर’च्या यशानंतर चांगली कामगिरी करणारा हा एकमेव हिंदी चित्रपट ठरला आहे.