Rajeev Khandelwal on Rajesh Khanna: राजीव खंडेलवाल हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर विविध चित्रपट, टेलिव्हिजन शो यांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच, तो रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनही करताना दिसतो. आता मात्र अभिनेता त्याच्या अभिनयामुळे नाही, तर तो त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्याने एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉलीवूडच्या कलाकारांकडून त्याला कशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मिळत होत्या, याबद्दल वक्तव्य केले. राजीव खंडेलवालने नुकतीच आर जे दिव्य सोलगामाला मुलाखत दिली.
“राजेश खन्नांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते मला…”
राजीव खंडेलवाल म्हणाला की, बॉलीवूडमधील अनेक कलाकार म्हणायचे की, तू खूप क्यूट आहेस. तू माझा आवडता आहेस. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री नीतू सिंग, सायरा बानू, बिंदू या राजीवचे कौतुक करीत असत. राजीव असेही म्हणाला की, त्या मला असे म्हणत की, तू नवीन पिढीचा काका (राजेश खन्ना) आहेस.
पुढे अभिनेत्याने एका पार्टीत तो राजेश खन्नांना भेटल्याची आठवण सांगितली. राजीव म्हणाला, “जेव्हा मला समजले की, राजेश खन्नादेखील त्याच पार्टीत आहेत. त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड वाढली. मला तिथल्या लोकांनी राजेश खन्नांजवळ नेले. ते त्यांना म्हणाले की, हा नवीन पिढीतील राजेश खन्ना आहे. याचे नावसुद्धा आर. के. आहे. राजेश खन्नांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते मला म्हणाले की तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, हे तुला माहीत आहे का? तू माझ्यापेक्षा जास्त चांगला अभिनेता आहेस.”
राजीव पुढे म्हणाला, “मी खूप चांगला आहे, हे मला यातून सांगायचे नाही. तर राजेश खन्ना किती प्रेमळ होते, त्यांच्याकडे किती नम्रता होती, हे मला सांगायचे आहे. कारण- मला २०० टक्के खात्री आहे की, ते मला ओळखत नव्हते, त्यांना मी माहीत नव्हतो.”
पुढे अभिनेत्याने दिलीप कुमार यांच्याबरोबर झालेल्या भेटीबद्दलही सांगितले. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांच्याशी भेट घडवून आणली होती.
राजेश खन्ना हे बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. बॉलीवूडला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यात राजेश खन्नांचे योगदान महत्त्वाचे आहे. आराधना, आनंद, कटी पतंग, बावर्ची, नमक हराम, हाथी मेरे साथी अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांचे रोमँटिक चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. राजेश खन्नांचा चाहतावर्ग मोठा होता.
आजही राजेश खन्नांच्या यश-अपयशाबद्दल बोलले जाते. तसेच त्यांचे स्टारडम, त्यांचे चाहते, त्यांचे अपयश, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची स्पर्धा, तसेच त्यांचे लग्न आणि रिलेशनशिप यांबद्दल आजही अनेक कलाकार वक्तव्ये करताना दिसतात.
