Rajeev Masand Bollywood Gossip: प्रसिद्ध माजी चित्रपट समीक्षक आणि ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी’चे सीओओ राजीव मसंद यांनी बॉलीवूड आणि कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल एक अतिशय विचित्र व धक्कादायक खुलासा केला आहे. सायरस ब्रोचा यांच्या टॉक शोमध्ये बोलताना त्यांनी आर्टिस्ट मॅनेजमेंटमधील आपल्या पहिल्या वर्षातील एक किस्सा शेअर केला. एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या वतीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी स्वतः राजीव मसंद यांना जावं लागलं होतं. कलाकारांच्या आयुष्यात काम करताना वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यातील सीमा कशी पुसट होते, यावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले आहे.

२०२१ मध्ये राजीव मसंद यांची ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. ही एजन्सी देशातील अनेक आघाडीच्या कलाकारांसाठी काम करते. राजीव यांना नोकरीच्या पहिल्याच वर्षी एक विचित्र गोष्ट करावी लागली होती. “मला आठवतंय, एकदा मला अतिशय विचित्र अनुभव आला होता. मी या नोकरीत नवीन होतो, आर्टिस्ट मॅनेजमेंटमधील माझं पहिलंच वर्ष होतं. मला एका अभिनेत्रीच्या वतीने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप करायला लागलं होतं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

अभिनेत्रीच्या वतीने ब्रेकअप करायला जावं लागलं – राजीव मसंद

राजीव मसंद म्हणाले, “मी विचार करत होतो की हे माझं काम नाही, पण तरीही मला ते करावं लागलं. मी एका रुममध्ये तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत बसलो होतो. हा माझ्या कामाचा भाग नाही, त्यामुळे मी हे करावंच असं नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्याचे करिअर व वैयक्तिक आयुष्यात गुंतलेले असतात तेव्हा काय करावं आणि काय नाही यात खूप पुसट सीमा असते. एजंट म्हणून तुम्ही त्यांच्या आयुष्यात इतके गुंतलेले असता की तुम्ही त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाता. पण मला आठवतंय, मी विचार केला होता की ‘हे माझं काम नाही’ आणि त्यानंतर मी पुन्हा कधीही असं काही केलं नाही.”

राजीव मसंद यांनी कलाकारांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. “मला वाटतं की कलाकारांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचा भ्रम होय. जेव्हा तुम्ही कलाकारांना इतर कलाकारांबद्दल किंवा इतर लोकांबद्दल बोलताना ऐकता, तेव्हा ते खूप निष्पक्षपणे बोलतात. पण जेव्हा स्वतःचा विषय येतो, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही निष्पक्ष दृष्टिकोन नसतो,” असं राजीव मसंद म्हणाले.