कंगना रणौत रस्ता भरकटली आहे, असं माजी चित्रपट समीक्षक आणि ‘धर्मा कोलॅब आर्टिस्ट्स एजन्सी’चे सीओओ राजीव मसंद यांना वाटतं. एक अभिनेत्री म्हणून कंगना आवडत असली तरी तिने राजकारणात प्रवेश केल्यावर तिच्यातील खरी अभिनेत्री हरवली असून आता ती फक्त एक ‘जोक’ बनली असल्याचं राजीव मसंद यांनी म्हटलं आहे. कंगनाने बॉलीवूडवर केलेले आरोप फेटाळून लावत त्यांनी तिच्या राजकीय आणि अभिनय प्रवासावर रोखठोक मते मांडली आहेत.

“मला अभिनेत्री कंगनाची खूप आठवण येते, पण आता ती फक्त विनोद आहे,” असं वक्तव्य राजीव मसंद यांनी केलं. कंगनाने आजवर बरेचदा म्हटलंय की बॉलीवूडमधील काही बड्या कलाकारांनी तिला इंडस्ट्रीत काम मिळू दिलं नाही, त्याबद्दल राजीव यांनी नाराजी व्यक्त केली. “मला माहीत नाही. पण ही लोकांना पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एक चांगली गोष्टी आहे. पण तसं काही आहे, असं मला वाटत नाही. वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. बॉलीवूडमध्ये यशाचा आदर केला जातो. सुरुवातीला अनेकांना संघर्ष करावा लागतो, पण एकदा यशस्वी झालात की झालं,” असं राजीव मसंद म्हणाले.

कंगना रणौतच्या अभिनयाचं केलं कौतुक

राजीव मसंद यांनी २०१४ मधील ‘क्वीन’ या प्रसिद्ध चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचं ‘उत्कृष्ट’ म्हणत कौतुक केलं. तसेच तिला ‘क्वीन २’ या सिक्वलमध्ये पाहण्यास उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “खरं तर तिने जे काही चांगले सिनेमे केलेत, ते सिनेमे चांगलेच होते आणि त्यात तिने चांगलं काम केलं. पण त्याचा अर्थ तिने थोडाफार ‘कंगना शो’सारखा (तिच्यामुळेच चित्रपट चालला) घेतला,” असं राजीव मसंद म्हणाले.

कंगना रणौतची आलिया भट्टशी केली तुलना

कंगना रणौतने वठवलेल्या सर्व भूमिकांमध्ये ती ते पात्र जगायची, त्यात कंगनाची झलक दिसायची नाही. पण कंगना पुन्हा चित्रपटांमध्ये त्याच ताकदीच्या भूमिका करेल, अशी आशा राजीव मसंद यांना आहे. पण त्यासाठी तिला तिचं राजकीय करिअर सोडावं लागेल, असं त्यांना वाटतं. राजीव यांनी कंगनाची तुलना आलिया भट्टशी करत, या दोघांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं.

कंगना रणौत, राखी सावंत, सुनीता आहुजा यांच्यासारख्या बिंधास्त बोलणाऱ्या लोकांमुळेच बॉलीवूडमध्ये गॉसिप्स मिळतात, असं वक्तव्य राजीव मसंद यांनी केलं. “या सगळ्या आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि मजेशीर आहेत,” असं ते म्हणाले.