Amitabh Bachchan Brother in law Rajeev Verma : महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमची जगभरात चर्चा असते, मात्र जया बच्चन यांच्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः त्यांच्या बहिणींबद्दल फारशी माहिती समोर येत नाही. जया बच्चन यांना रिता आणि निता नावाच्या दोन बहिणी आहेत. यातील रिता यांचे पती म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे साडू हे बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचं नाव आहे राजीव वर्मा. ‘मॅनें प्यार किया’ चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणारे राजीव वर्मा आज ग्लॅमर जगतापासून दूर असून त्यांनी अभिनय सोडण्यामागचं एक अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक कारण समोर आलं आहे.

जया बच्चन यांचा जन्म मध्य प्रदेशात झाला. त्यांचे वडील तरुण कुमार भादुरी हे पत्रकार, लेखक आणि कवी होते, तर त्यांच्या आईचे नाव इंदिरा आहे. जया बच्चन यांना रिता आणि निता नावाच्या दोन बहिणी आहेत. जया फिल्म इंडस्ट्रीत आल्या, तर त्यांच्या दोघी बहिणींनी ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहणं पसंत केलं.

अमिताभ बच्चन यांचे साडू आहेत राजीव वर्मा

जया बच्चन यांच्या एका बहिणीच्या पतीचं मात्र फिल्म इंडस्ट्रीशी जवळचं नातं राहिलंय. होय. अमिताभ बच्चन यांचे साडू लोकप्रिय अभिनेते असून त्यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. त्यांचं नाव आहे राजीव वर्मा. आर्किटेक्ट असलेले राजीव वर्मा करिअर सोडून अभिनयाकडे वळले. बरीच वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला. सध्या ते एक हॉटेल चालवतात.

राजीव वर्मा व रीता भादुरी यांची भेट

राजीव वर्मा मूळचे होशंगाबादचे रहिवासी होते. ते भोपाळमध्ये थिएटर करत होते आणि याच दरम्यान त्यांची व रीताची भेट झाली. दोघे प्रेमात पडले आणि तीन वर्षांच्या अफेअरनंतर रीता आणि राजीव यांनी १९७६ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्न केलं तेव्हा राजीव वर्मा हे पेशाने आर्किटेक्ट होते व पुढे अभिनयात आले, तर रीता या सेंट्रल स्कूलमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. रिटा आणि राजीव यांना दोन मुलं आहेत.

rajeev-verma-amitabh-bachchan-saadu-jaya-bachchan-sister-husband(1)
राजीव वर्मा

राजीव वर्मा हे ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी ‘मैनें प्यार किया’ चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची, तर ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटात तब्बूच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तसेच, त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘कोई मिल गया’, ‘कच्चे धागे’, ‘हिंमतवाला’, ‘चलते चलते’ आणि ‘क्या कहना’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन आणि राजीव वर्मा यांनी ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘आरक्षण’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

राजीव वर्मांनी अभिनय का सोडला?

रीटा आणि राजीव हे भोपाळमध्ये राहतात. ते ‘भोपाळ थिएटर्स’ आणि हॉटेल सरल ग्रुपचे मालक आहेत. “एक काळ असा आला जेव्हा मला अभिनयात रस उरला नाही. मी आता अभिनय करू नये, असं मला वाटू लागलं. हे काम मला पूर्वी मी करत असलेल्या ऑफिसच्या नोकरीसारखंच वाटू लागलं होतं, फरक एवढाच होता की इथे मिळणारा पगाराचा चेक मोठा होता. मला पूर्वी मिळणारा आनंद आणि समाधान कुठेतरी हरवलं होतं,” असं अभिनयाबद्दल राजीव म्हणाले.

अनेक वर्षे त्यांना हे जाणवत होतं. तसेच अभिनयामुळे ते कुटुंबीय आणि मित्रांबरोबरचे महत्त्वाचे क्षणही जगू शकत नव्हते. राजीव म्हणाले, “पाच-सहा वर्षांपूर्वी मी भोपाळला परतलो. त्याच्याही दोन-तीन वर्षे आधीपासून मला असं वाटत होतं की अभिनय म्हणजे रोजचं ठरलेलं काम झालंय, मला त्यात रस उरला नव्हता. मित्रांसोबत वेळ घालवणं, लग्नाला उपस्थित राहणं, कौटुंबिक कार्यक्रम आणि आयुष्याचा आनंद घेणंही जमत नव्हतं. एका टप्प्यानंतर तुम्हाला या गोष्टींची उणीव भासू लागते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर, आई-वडिलांबरोबर आणि मित्रांसोबत वेळ घालवावासा वाटतो.”

राजीव वर्मा यांनी आर्थिक परिस्थितीबद्दलही सांगितलं. त्यांची मुलं करिअरमध्ये स्थिरावली आहेत, त्यामुळे त्यांना पैशांची काळजी नाही. मनोरंजन विश्वातील सततच्या धावपळीच्या आयुष्याऐवजी त्यांनी शांत आणि समाधानी आयुष्य जगणं निवडलंय. त्यांनी अभिनयापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलेलं नाही. ते मुंबईत काम करत नसले तरी भोपाळमध्ये नाटक करतात आणि तिथेच जगण्यास प्राधान्य देतात.