Rajesh Khanna Aashirwad Bungalow : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांचा बंगला मुंबईतील वांद्रे येथे होता. या बंगल्याचे नाव ‘आशीर्वाद’ होतं. हा बंगला त्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा एक महत्त्वाचा भाग होता. समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यात राजेश खन्ना १९७० च्या दशकात राहायला आले तेव्हा यशाच्या शिखरावर होते. पण नंतर मात्र त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.
२०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांनी ९० कोटी रुपयांना हा बंगला विकला. आता त्याची किंमत सुमारे २२५ कोटी रुपये आहे. पण हा बंगला केवळ काकांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे तिथे घालवली म्हणून प्रसिद्ध नव्हता, तर अनेक सुपरस्टार्सचंही या बंगल्यात वास्तव्य होतं म्हणून चर्चेत होता.
सर्वात आधी बंगला घेणारा अभिनेता
मुंबईतील कार्टर रोडवरील ‘आशीर्वाद’ बंगल्यात पूर्वी एक अँग्लो-इंडियन कुटुंबीय राहत होते. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी दिग्गज अभिनेते भारत भूषण यांनी हा बंगला खरेदी केला होता. ‘बैजू बावरा’ आणि ‘मिर्झा गालिब’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये अभिनयासाठी लोकप्रिय असलेले भारत भूषण यांची दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्याशी बरोबरीची स्पर्धा होती. या बंगल्यात काही वर्षे राहिल्यानंतर त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. भारत भूषण यांची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली की कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला. भारत भूषण हे पहिले होते ज्यांच्यासाठी हा बंगला दुर्दैवी ठरला.
भारत भूषण यांच्यानंतर जुबली कुमार राजेंद्र कुमार यांनी ६० च्या दशकात हे घर ६०,००० रुपयांना खरेदी केलं होतं. आधीच्या स्टारप्रमाणेच, राजेंद्र कुमार यांच्या करिअरलाही हे घर घेतल्यावर उतरती कळा लागली. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. त्यानंतर राजेंद्र कुमारकडे बंगला विकण्याशिवाय पर्याय नव्हता. राजेंद्र कुमार यांचा बंगला इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी विकत घेतला होता.

राजेश खन्ना यांनी ७० च्या दशकाच्या सुरुवातीला हा बंगला ३.५ लाख रुपयांना खरेदी केला होता आणि त्याचे नाव आशीर्वाद ठेवले होते. राजेश खन्ना या घरात राहायला आले तेव्हा ते करिअरच्या शिखरावर होते आणि त्यांनी सलग १७ हिट चित्रपट दिले होते. पण हे यश फार काळ टिकलं नाही आणि लवकरच त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.
राजेश खन्ना यांच्या करिअरला उतरती कळा लागली आणि वैयक्तिक आयुष्यही बरबाद झाले. मात्र त्यांनी तो बंगला सोडला नाही आणि २०११ मध्ये त्यांचं निधन झालं, तेव्हापर्यंत ते त्याच ‘आशीर्वाद’ बंगल्यात राहिले. तीन दिग्गज अभिनेत्यांच्या करिअरला या बंगल्यात राहायला आल्यानंतर उतरती कळा लागली, त्यामुळे हा बंगला सिनेसृष्टीतील कलाकारांना लाभत नसल्याचं म्हटलं जाऊ लागलं.