Rajesh Khanna Roop Tera Mastana song : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सिनेविश्वातील किस्से आणि अनुभव अनेकदा समोर येतात. राजेश खन्ना यांची काम करण्याची पद्धत व उशिरा सेटवर येण्याची सवय यांचा उल्लेख अनेकदा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांनी केला आहे. मात्र, राजेश खन्ना यांचा चाहतावर्गही प्रचंड होता. त्यांची एका झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आराधना या सिनेमाचा उल्लेख आवर्जून येतो. त्यातील एका गाण्याने राजेश खन्ना यांच्या करिअरला वेगळे वळण दिले होते.

७० च्या दशकामध्ये सिनेविश्वामध्ये राजेश खन्ना यांचे नाव प्रचंड गाजत होते. त्यांच्या आराधना सिनेमातील अभिनयाचे सर्वांकडून जोरदार कौतुक होत होते. या सिनेमातील किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यामुळे किशोर कुमार यांना पहिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. दुसरीकडे, राजेश खन्ना यांच्या लोकप्रियतेने उंची गाठली. शर्मिला टागोर व राजेश खन्ना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त हिट ठरली.

फक्त एका टेकमध्ये झालेलं गाणं शूट

सध्याच्या तंत्रज्ञानाने प्रगत असूनही गाण्याच्या शूटिंगसाठी चार ते पाच दिवस जातात. मात्र, ७० च्या दशकात ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणे फक्त एका टेकमध्ये शूट करण्यात आले होते. त्यामागे कोणताही कलात्मक प्रयोग करण्याचा उद्देश नव्हता; तर वेळेची कमतरता हे कारण होते.

‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याचे शूटिंग ज्या सेटवर सुरू होते, तो सेट दुसऱ्या निर्मात्याला देण्यात येणार होता. त्यामुळे चित्रपटाच्या टीमकडे वेळ खूप कमी होता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी एक धाडसी निर्णय घेतला. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्याकडून तासन् तास सराव करून घेतल्यानंतर कॅमेरा सुरू करण्यात आला आणि संपूर्ण गाणे एकाच टेकमध्ये शूट करण्यात आले.

राजेश खन्ना

वडिलांचं अपूर्ण काम मुलानं केलेलं पूर्ण

‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याचे संगीत एस. डी. बर्मन यांच्या नावावर आहे. मात्र, या गाण्यामागची कहाणीही तितकीच रंजक आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू असताना एस. डी. बर्मन यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी या गाण्याची केवळ चाल तयार केली होती.

राजेश खन्ना

त्यानंतर ही चाल पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचे पुत्र आर. डी. बर्मन यांनी घेतली. पंचमदा यांनी वडिलांच्या शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या चालीत जॅझ आणि सांबा संगीत एकत्रित करीत, एक वेगळे फ्युजन तयार केले. त्यामुळे या गाण्याला एक मॉडर्न टच मिळाला आणि गाणे जबरदस्त हिट ठरले. एका गाण्यामुळे राजेश खन्ना यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. याच वेगळेपणामुळे ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याचा आजही सुपरहिट गाण्यांमध्ये समावेश होतो.