Anil Kapoor on Father Surinder Kapoor and Rajesh Khanna: राजेश खन्नांचे ‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दो रास्ते’, ‘नमक हराम’, ‘आप की कसम’ असे अनेक चित्रपट गाजले. या चित्रपटांतून राजेश खन्नांची लोकप्रियता सर्वदूर पसरली. असे म्हणले जाते की राजेश खन्नांइतके स्टारडम कोणीही अनुभवले नाही. तसेच, राजेश खन्नांनी मोठ्या प्रमाणात यश पाहिल्यानंतर त्यांना मोठ्या अपयशालादेखील सामोरे जावे लागले. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले.
आजही अनेक कलाकार राजेश खन्नांबद्दल बोलतात. नुकतीच अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत राजेश खन्नांच्या फ्लॉप चित्रपटांचा वडील निर्माते सुरिंदर कपूर यांच्यावर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊ…
“माझे वडील खूप चांगले…”
लिली सिंगला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर म्हणाले, “माझे वडील खूप चांगले व्यक्ती होते. अत्यंत नम्र, खूप प्रामाणिक होते. १९५०-६० दशकाच्या दरम्यान ते मुंबईत आले होते. त्यानंतर ते के. आसिफ यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. त्यानंतर एका अभिनेत्याचे मॅनेजर म्हणून त्यांनी काम करायला सुरूवात केली. मी चित्रपटसृष्टीत जिथे जिथे गेलो, तिथे लोक नेहमी मला सांगायचे की माझे वडील किती चांगले माणूस होते, तसेच ते खूप नम्र आणि प्रामाणिक होते.”
आई निर्मल कपूर यांच्याबद्दल अनिल कपूर म्हणाले, “माझी आई खूप उत्तम स्वयंपाक करायची. तिने बनवलेल्या जेवणाचे खूप कौतुक व्हायचे. आम्ही चेंबूरमध्ये, आरके स्टुडिओजजवळ राहायचो. कोणाचंही शूटिंग चालू असो, आमच्या घरून जेवण जायचं. इंडस्ट्रीमध्ये कोणालाही सल्ल्याची गरज असेल तर ते माझ्या आईला विचारायचे.”
वडील निर्मिती क्षेत्रात असूनही, जेव्हा अनिल कपूर यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर सुरिंदर कपूर यांनी काय सांगितले होते याबद्दलही अनिल कपूर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “ते मला म्हणाले होते की तू अभिनय क्षेत्रात काम कर, पण मी तुझ्यासाठी चित्रपट बनवू शकत नाही. तुला स्वत: तुझ्यासाठी काम शोधावं लागेल. ते चांगलं होतं, कारण मला जे करायचं होतं ते त्यांनी मला करू दिलं. मला माझी स्वप्ने पूर्ण करू दिली. माझे शिक्षण पूर्ण होण्याआधीच मी काम करायला सुरुवात केली होती. १८ व्या, १९ व्या वर्षापासून मी काम करायला सुरुवात केली होती.”
याच मुलाखतीत अनिल कपूर यांनी राजेश खन्नांबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले, ” मला आठवतं की माझ्या वडिलांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना प्रमुख भूमिकेत होते. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. तो सिनेमा अपयशी ठरला. त्या सिनेमाने अनेक गोष्टी अवघ्या काही तासांत बदलल्याचे मला आठवते.”
पुढे ते म्हणाले, “ते दिल्लीहून बंगळुरूला गेले, कारण त्या काळात चित्रपट वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी प्रदर्शित होत असत, एकाच वेळी नाही. पण, विमानतळावर त्यांना घेण्यासाठी कोणीच आलं नव्हतं. सगळ्यांनी त्यांच्यापासून दुरावा ठेवला होता. ते खूप धक्कादायक होतं; मी त्यांना पहिल्यांदाच अशा अवस्थेत पाहिलं. ते परत आले तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा किती धक्का बसला आहे हे दिसत होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तो प्रसंग माझ्या मनात राहिला. राजेश खन्नांच्या फ्लॉप सिनेमामुळे माझे वडील उद्ध्वस्त झाले. माझ्या वडिलांना त्या अवस्थेत पाहिल्यामुळेच कदाचित मी नेहमीच हीरो बनण्यासाठी, मुख्य भूमिका साकारण्यासाठी प्रयत्न केले”, असे म्हणत अनिल कपूर यांनी एक चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे त्याचा वडिलांवर काय परिणाम झाला हे सांगितलं.
