Rajesh Khanna Insulted Amitabh Bachchan: राजेश खन्ना व अमिताभ बच्चन हे दोन्हीही बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. दोघांनाही सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.
राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार असल्याचे म्हटले जाते. मात्र, अमिताभ बच्चन अभिनय क्षेत्रात आल्यानंतर समीकरणे बदलली. अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन म्हणून ओळख निर्माण झाली. बॉलीवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. त्यामुळे अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. त्यांच्यातील स्पर्धेबद्दल आजही अनेक कलाकार बोलतात.
एका जुन्या मुलाखतीत पत्रकार अली पीटर जॉन यांनी राजेश खन्ना यांचा उतरता काळ फार जवळून पाहिल्याचे वक्तव केले होते. त्यांनी म्हटले होते, “डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या करिअरचा उतरता काळ सुरू झाला होता. पण, राजेश खन्ना यांनी त्यांचे मानधन कमी केले नाही”, असे रेडिफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केले होते.
“राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यापासून…”
पुढे त्यांनी सांगितलेले की, “राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यापासून असुरक्षित वाटत होते. ते अनेकदा अमिताभ बच्चन यांच्याविषयी पाठीमागे बोलत असत. जया भादुरी यांनादेखील ते म्हणत की, या माणसाबरोबर का फिरतेस. त्याचे काही होणार नाही. मात्र, तरीही त्यांनी अमिताभसोबत ‘बावर्ची’ हा चित्रपट केला. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांचा अपमान केला.”
“चित्रपटाच्या सेटवर राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यावेळी जया यांनी अमिताभला समजावले की त्यांच्या गैरवर्तणुकीकडे लक्ष देऊ नका. एक दिवस बघ तुम्ही कुठे असाल आणि हे कुठे असतील.” या घटनेचा मी स्वत: साक्षीदार होतो, असे पत्रकार अली पीटर जॉन यांनी या मुलाखतीत म्हटले होते. याबरोबरच, अली पीटर जॉन यांनी एकदा राजेश खन्ना हे बंगल्याच्या टेरेसवर जाऊन अतिशय वाईटप्रकारे रडल्याची आठवणदेखील सांगितली आहे.
राजेश खन्ना यांचा आयुष्य़ाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन शेवटपर्यंत होता असे म्हटले जाते. त्यांना ‘बिग बॉस’ या टीव्ही शोची ऑफरदेखील आली होती. प्रत्येक एपिसोडला त्यांना ३.५ कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी नकार दिला. जेव्हा त्यांचे मन बदलले आणि या शोमध्ये जाण्याचा विचार केला, त्यावेळी बिग बॉसच्या निर्मात्यांनी नकार दिल्याचे म्हटले जाते. डिंपल कपाडिया यांनीदेखील राजेश खन्ना यांच्या अशा वागण्याबद्दल ‘इंडिया टुडे’शी बोलताना खुलासा केला होता.
