Rajesh Khanna Anita Advani Marriage Controversy: दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांच्यातील वादग्रस्त कायदेशीर प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री अनिता अडवाणीची याचिका फेटाळून लावली. अनिताने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या तिच्या नात्याला लग्न म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख यांनी मुंबईतील दिंडोशी दिवाणी न्यायालयाचा २०१७ चा निकाल कायम ठेवला. दिवाणी न्यायालयाने यापूर्वीच अनिताची मागणी फेटाळली होती. मग तिने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया, मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी अनिताची याचिका फेटाळली.

राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या नात्यावरून अनिताचा हा कायदेशीर लढा गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे. आपलं नातं लग्नासारखंच होतं, याआधारे अनिता अडवाणीने याचिका दाखल केली होती. “आम्ही खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. पण चित्रपटसृष्टीत कोणीही अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलत नाही. सगळे म्हणतात की ‘आम्ही मित्र आहोत’ किंवा ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत’ किंवा इतर काही. पण मीडियात आधीच बातमी आली होती की आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाही आम्ही लग्न केलंय आहे हे जाहीर करण्याची गरज कधीच वाटली नाही,” असं अनीता म्हणाली.

राजेश खन्ना-अनिताने मंदिरात केलेलं लग्न

हा खासगी सोहळा कुठे झाला होता? असं विचारल्यावर ती म्हणाली, “आमच्या घरी एक लहान मंदिर होते. मी काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेतले होते. त्यांनी ते माझ्या गळ्यात घातले. माझ्या भांगेत कुंकू भरले आणि म्हणाले, ‘आजपासून तू माझी जबाबदारी आहेस.’ अशा रितीने एका रात्री आमचे लग्न झाले होते.”

Award Banner

राजेश खन्ना डिंपल कपाडियांना भेटण्यापूर्वी आपण नात्यात होतो, तेव्हा लग्न केलं नाही कारण मी खूप लहान होते. तिने राजेश खन्नांसाठी करवा चौथचे व्रत केल्याचा दावाही केला. “हो, मी डिंपल कपाडियांच्या आधी त्यांच्या आयुष्यात आले होतो. पण त्यावेळी आम्ही लग्न केलं नाही, कारण मी खूप लहान होते. मग मी जयपूरला परत गेले होते,” असं ती म्हणाली.

राजेश खन्ना अनिता अडवाणीला मारहाण करायचे

नात्यात असताना राजेश खन्ना मारहाण करायचे, असंही अनिताने सांगितलं. ‘अवंती फिल्म्स’ या युट्यूब चॅनलशी बोलताना ती म्हणाली, “ते कधीकधी मला मारहाण करायचे. त्यामुळे मीही त्यांना मारायचे. ती माझी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. मी नखाने ओरबाडलंय, असं ते म्हणायचे.”

दारू प्यायल्यानंतर राग काढायचे राजेश खन्ना

‘रेडिफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनिताने आरोप केला की, राजेश खन्ना दारू प्यायल्यानंतर खूप त्रास द्यायचे. “ते मला म्हणायचे की, ‘मी चुकीचा असलो तरी तू गप्प बसत जा.’ त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग यायचा. त्यांना फक्त राग काढायचा असायचा, त्यासाठी कारण महत्त्वाचं किंवा तार्किक नसायचं. तो काळ खूप कठीण होता. नशेत असताना ते कधीकधी मला मारहाणही करायचे. पण जेव्हा ते नशेत नसायचे, तेव्हा ते अत्यंत चांगले वागायचे,” असं अनिता अडवाणी म्हणाली.

राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलं होतं, पण दहा वर्षांतच ते दोघे वेगळे झाले. ते पुन्हा कधी एकत्र आले नाहीत, पण त्यांनी घटस्फोटही घेतला नव्हता. अनिता अडवाणीच्या मते, राजेश खन्ना नंतर पुन्हा तिच्याबरोबर राहू लागले आणि २०१२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते एकत्रच होते. राजेश खन्नांच्या इतक्या जवळ असूनही तिला त्यांच्या अंत्यसंस्कारात जाता आलं नव्हतं. तसेच त्यांच्या प्रार्थनासभेत जाण्यापासून अडवण्यात आलं होतं, असंही तिने सांगितलं.