भारतीय सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत अशी छाप सोडली, ज्याची बरोबरी करणं आजही कदाचित कोणालाच जमलेलं नाही. वैयक्तिक आयुष्यात ‘आनंद’ फेम राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याबरोबर संसार थाटल्यानंतर त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. कुटुंबातच अभिनयाची आणि कलेची परंपरा असल्याने दोन्ही मुलींनीही मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी वेगवेगळ्या माध्यमांतून त्या आजही प्रेक्षकांच्या संपर्कात आहेत.

ट्विंकल आणि रिंकी या दोन्ही बहिणींनी काही चित्रपटांमध्ये काम करत मनोरंजनविश्वात त्यांचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला . मात्र, त्यांच्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे दोघींनीही अभिनयाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. ट्विंकल खन्नाने लेखिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती पुस्तकं आणि स्तंभलेखन करत असून, चित्रपट निर्मितीमध्येही तिने काम केलं आहे. तर रिंकी खन्नाने मात्र झगमगत्या चंदेरी दुनियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ती भारतापासून दूर लंडनमध्ये कुटुंबाबरोबर राहत आहे.

१९९९ मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून रिंकी खन्नाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली, मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर रिंकीने ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘ये है जलवा’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘झंकार बीट्स’, ‘प्राण जाए पर शान न जाए’ यांसह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र सलग चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर रिंकीने उद्योजक समीर सरन यांच्याशी लग्न केलं आणि हळूहळू फिल्म इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केलं. ४७ वर्षीय रिंकी दोन मुलांची आई आहे. तिची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे. रिंकी खन्नाची मुलगी नाओमिका सरन लवकरच अभिनेता अगस्त्य नंदाबरोबर एका रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

समीर सरन – राजेश खन्नांचे धाकटे जावई

India.comच्या वृत्तानुसार, समीर सरन यांची तब्बल २५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अक्षय कुमारबरोबर राजेश खन्ना यांच्या दुसऱ्या जावयाच्या श्रीमंतीचीही चर्चा होते. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले समीर सरन एका कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीच्या मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि लंडन यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये शाखा आहेत. रिंकी खन्ना आणि समीर सरन यांनी २००३ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर हे जोडपं आपल्या मुलांसह लंडनमध्ये आलिशान आयुष्य जगत आहे.