Rajesh Khanna Alcohol Addiction Kalyanji Anandji Interview: बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव कलाकार अनेकदा शेअर करताना दिसतात. संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांनीही राजेश खन्ना यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना केलेली मदत आणि सुपरस्टार झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात झालेला बदल याबद्दल सांगितले आहे. यासोबतच आनंदजी यांनी राजेश खन्ना यांच्या मद्यपानाच्या सवयीचाही उल्लेख केला.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संगीतकार आनंदजी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही (कल्याणजी-आनंदजी) राजेश खन्ना यांना प्रोत्साहित करत होतो. ‘राझ’ या सिनेमासाठी आम्ही संगीत देत होतो. त्यावेळी आम्ही त्यांना निर्मात्यांकडे जाण्यास सांगितले आणि त्यांची शिफारसही केली. ‘सच्चा झूठा’साठीही आम्ही त्यांचे नाव सुचवले होते. ते प्रेक्षकांमध्ये नक्कीच लोकप्रिय होतील, असे आम्ही निर्मात्यांना सांगायचो. डिस्ट्रीब्यूटर्ससुद्धा ‘कौनसा घोडा चलने वाला है’ हे पाहायचे. कल्याणजींना ज्योतिषशास्त्राची माहिती असल्याने लोक त्यांच्या सल्ल्यालाही महत्त्व द्यायचे.”

लोकांनी आपल्यासमोर झुकावे अशी त्यांची अपेक्षा – आनंदजी

पुढे आनंदजी म्हणाले, “पण जसजसा काळ गेला, तसतसे या लोकांच्या वागण्यात बदल झाला. पूर्वी ते आम्हाला ‘सर’ म्हणायचे, पण नंतर त्यांच्यात बदल झाला. त्यांना स्वतः कोणीतरी महान असल्यासारखे वाटू लागले होते. लोकांनी आपल्यासमोर झुकावे अशी त्यांची अपेक्षा होती,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

राजेश खन्ना यांना मद्याचे व्यसन लागले होते आणि ते खूप मद्यपान करायचे, असा दावाही आनंदजींनी केला. ‘जोरू का गुलाम’मधील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगताना ते म्हणाले, “एकदा राजेश खन्ना एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आले होते. त्यानंतर ते शूटिंगसाठी सेटवर गेले अन् ‘मी हे गाणे करणार नाही’ असे म्हणत गोंधळ घातला होता. त्यावर मी म्हणालो, ‘मग मला इथे का बोलावलं आहे? जर तुम्हाला ते करायचं नसेल, तर शूटिंग करू नका आणि सिनेमातून गाणे काढून टाका.’”

राजेश खन्ना यांचा स्टारडम एक दिवस संपुष्टात येईल, असे त्यावेळीच जाणवल्याचेही आनंदजींनी सांगितले. ते म्हणाले, “मी राजेशला स्पष्टपणे सांगितले होते की, आता तुला सर्व काही कळतंय असं तुला वाटत असेल, तर तुझ्या यशाचा काळ संपला आहे असे समज. माणसाने अशा पद्धतीने वागू नये. जमिनीवर राहणे आणि इतरांना त्यांचे काम करू देणे महत्त्वाचे असते.”

काही वर्षांनंतर राजेश खन्ना यांच्या करिअरला उतरती कळा लागल्यानंतर दोघांची भेट झाली. त्यावेळी राजेश खन्ना यांनी आनंदजींना विचारले, “आनंदजी, तुमचा राग आता कमी झाला का?” त्यावर आनंदजी म्हणाले, “ज्या कारणामुळे मी नाराज होतो, ते घडून गेले आहे. आता त्याचा काही उपयोग नाही.”

राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘राझ’ या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले. पुढे त्यांनी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याकडे ‘सच्चा झूठा’साठी राजेश खन्ना यांची शिफारस केली. १९७० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता.