Rajesh Khanna’s stardom: राजेश खन्ना हे बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार होते. त्यांच्या स्टारडमबद्दल आजही बोलले जाते. त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार त्यांच्या लोकप्रियतेबद्दल अनेकदा वक्तव्य करतात, राजेश खन्नांच्या चाहत्यांचे किस्से सांगतात. विशेषत: चाहत्यांमध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुली वेड्या होत्या. असे म्हटले जाते की मुली राजेश खन्नांच्या गाडीला किस करत असत, त्यामुळे त्यांची पांढऱ्या रंगाची कार लिपस्टिकमुळे लाल होत असे; तर काही जणींनी त्यांच्या फोटोशी लग्न केले होते, तर काही जणी त्यांच्या गाडीपुढे झोपत असत.

‘बीबीसी न्यूज इंडिया’च्या डॉक्युमेंटरीमध्ये राजेश खन्नांना विचारलेले की, अभिनय करताना तुम्ही अशी कोणती गोष्ट करता ज्यामुळे महिला, मुली तुमच्याकडे आकर्षित होतात. मुली व महिलांना आकर्षित करण्यासाठी कोणते हावभाव करता? यावर राजेश खन्ना म्हणालेले, “कदाचित त्यांना माझं हसू आवडत असेल.” पुढे त्यांना असेही विचारले की, तुम्ही तुमच्या डोळ्यांसाठीही लोकप्रिय आहात. त्यावर राजेश खन्ना म्हणालेले की, मी गाणे गात असताना ज्या पद्धतीने डोळ्यांची उघडझाप करतो, कदाचित ते लोकांना आवडत असेल.

राजेश खन्नांबरोबर काश्मीरमध्ये काय घडलेलं?

राजेश खन्ना एकदा काश्मीरमध्ये शूटिंग करत होते, त्यावेळीही त्यांना चाहत्यांचा असाच काहीसा अनुभव आला होता. मुमताज व राजेश खन्ना ‘आप की कसम’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. चाहत्यांनी त्यांची झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एका महत्त्वाच्या भावनिक सीनचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी लोकांनी इतकी गर्दी केली की धक्काबुक्की झाली, त्यामुळे सीन खराब झाला. काही लोक राजेश खन्नांना पाहण्यासाठी झाडावर चढले. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांनी सीनचे शूटिंग मध्येच थांबवले आणि गर्दीला बाजूला होण्यास सांगितले.

गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला बोलावण्यात आले. त्या काळात काश्मीरच्या खोऱ्यात जेव्हा चित्रपटाचे शूटिंग व्हायचे, तेव्हा भारतीय लष्कर किंवा स्थानिक पोलिसांना बोलावणे ही सामान्य गोष्ट होती. सैन्याला बोलावूनही गर्दी अजिबात हलत नव्हती, त्यामुळे शूटिंगचे ठिकाण आठ वेळा बदलावे लागले. इतकी राजेश खन्नांची लोकप्रियता होती.

राजेश खन्ना यांनी १९६० च्या दशकात अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९७० व १९८० च्या दशकात ते देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. त्यांचे सलग १७ चित्रपट हिट झाले. हा विक्रम आजही कोणी मोडू शकले नाही.