दिवंगत सुपस्टार राजेश खन्ना हे त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. पण स्टारडम मिळण्यापूर्वी, राजेश जतीन या नावाने ओळखले जात होते. तेव्हा ते अंजू महेंद्रू नावाच्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात होते. राजेश आणि अंजू यांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा ते एकत्र नाटकात काम करत होते, पुढे ते प्रेमात पडले होते.

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू जवळजवळ सात वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. १९६० च्या दशकात लिव्ह इनमध्ये राहणं ही एक मोठी गोष्ट होती. राजेश खन्ना सुपरस्टार असताना अंजू यांनी त्यांच्या करिअरसाठी स्वतःचं करिअर बाजूला ठेवले होते. मात्र, एका भांडणानंतर अंजू महेंद्रू यांनी रागाच्या भरात वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू गॅरी सोबर्सबरोबर जवळीक वाढवली. गॅरी सोबर्स यांनी अंजूला लग्नासाठी प्रपोज केलं आणि अंजू यांनी लगेच होकार दिला. हे समजताच राजेश खन्ना अत्यंत अस्वस्थ झाले. ते या घटनेने इतके दुखावले गेले होते की ते ढसाढसा रडले होते, असं म्हटलं जातं.

अंजू महेंद्रू यांनी नंतर एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, गॅरी सोबर्स यांच्याशी साखरपुडा करण्याचा उद्देश राजेश खन्ना यांना हेवा वाटावा हा होता. राजेश खन्ना पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्यावर, अंजू यांनी खुद्द राजेश खन्ना यांच्या घरातूनच गॅरी सोबर्स यांना फोन केला आणि साखरपुडा मोडला होता. या घटनेमुळे राजेश खन्ना आणि अंजू पुन्हा जवळ आले होते, पण त्यांच्यातील संशय आणि वाद वाढतच गेले. राजेश खन्ना यांचा स्वभाव आणि लग्नाबाबतची टाळाटाळ यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. शेवटी १९७२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

डिंपल कपाडियांशी लग्न आणि ‘ती’ वरात

ब्रेकअपच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, राजेश खन्ना यांनी अवघ्या १६ वर्षीय डिंपल कपाडिया यांच्याशी लग्नाचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. पण राजेश खन्ना यांना डिंपलशी लग्न करायचं नव्हतं, तर त्यांना अंजू महेंद्रू यांना आपलं स्टारडम आणि यश दाखवून द्यायचं होतं.

मार्च १९७३ मध्ये जेव्हा राजेश खन्ना यांची लग्नाची वरात निघाली, तेव्हा त्यांनी मुद्दाम असा रस्ता निवडला, जो अंजू महेंद्रू यांच्या घरासमोरून जात होता. इतकेच नाही तर वरात नेहमीच्या रस्त्याने न नेता अंजू यांच्या बंगल्यासमोरून नेण्यात आली. जेव्हा वरात अंजू यांच्या घरापाशी पोहोचली, तेव्हा राजेश खन्ना यांनी तिथे बराच वेळ वरात थांबवून धरली होती. तिथे बँड-बाजा मोठ्याने वाजवण्यात आला आणि राजेश खन्ना यांनी मुद्दाम तिथे जास्त डान्स आणि जल्लोष होईल याची खात्री केली होती, असं म्हटलं जातं.

अंजू महेंद्रू यांची प्रतिक्रिया

अंजू महेंद्रू यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं की, राजेश खन्ना हे अत्यंत पझेसिव्ह आणि इगो असलेले व्यक्ती होते. लग्नाच्या वरातीच्या या घटनेने त्यांना मानसिक त्रास झाला, पण त्यांनी स्वतःला सावरले. राजेश खन्ना यांचं हे वागणं सूडाची भावननेतून होतं, असं अंजू यांनी म्हटलं होतं.

विशेष म्हणजे, दोघांमध्येही इतका कटुता असूनही आयुष्याच्या उत्तरार्धात राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू पुन्हा मित्र झाले. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांत अंजू त्यांच्याबरोबर होत्या आणि त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारालाही त्या उपस्थित राहिल्या होत्या.