Amrish Puri Rajinikanth Shooting Incident: बॉलीवूडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. पडद्यावर खलनायकाच्या प्रभावी भूमिका साकारणारे अमरीश पुरी हे वैयक्तिक आयुष्यात मात्र सहकलाकारांशी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं वागत होते. त्यांचे बॉलीवूडमधील अनेक कलाकारांशी मायेचे संबंध होते. आता त्यांचा मुलगा राजीव पुरी यांनी वडिलांच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राजीव पुरी यांनी सनी देओल व अजय देवगण यांचं अमरीश पुरींबरोबरच्या खास नात्याचा खुलासा केला. ते म्हणाले, “सनी देओल आणि अजय देवगण हे अमरीश पुरींना वडिलांसारखं मानायचे. ते दोघेही त्यांच्यासाठी मुलांसारखे होते. सनीच्या मनात डॅडींबद्दल खूप प्रेम होतं आणि तो त्यांच्याशी खूप भावनिकरीत्या जोडलेला होता. सनीच्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्याने डॅडींबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसेच डॅडी हे धर्मेंद्रजींचेही खूप जवळचे मित्र होते.”

अजय देवगणच्या पहिल्याच सिनेमात अमरीश पुरी झालेले त्याचे वडील

अजय देवगणबरोबर अमरीश पुरींच्या नात्याबद्दल राजीव म्हणाले, “डॅडींनी अजयबरोबर त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और काँटे’ केला होता.” १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अजय देवगणने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात अमरीश पुरी यांनी अजयच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये खास नातं तयार झालं होतं.”

अमरीश पुरी यांचे जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, संजय दत्त आणि कुमार गौरव यांच्याबरोबर चांगले संबंध होते. सनी देओल किंवा अजय देवगण हे घरासमोरून जाताना अनेकदा अमरीश पुरी यांच्या आठवणीने घराकडे वळून पाहायचे, असंही राजीव यांनी सांगितलं. राजीव म्हणाले, “मी अनेकदा पाहिलं आहे की, सनी किंवा अजय इथून जाताना नेहमी मागे वळून आमच्या घराकडे पाहतात आणि डॅडींना आदरांजली देतात. त्यांच्या मनात वडिलांबद्दल कितीतरी आठवणी असतील. त्यामुळे हे पाहून खूप चांगलं वाटतं.”

रजनीकांत व अमरीश पुरी यांचा शूटिंगचा किस्सा

राजीव यांनी रजनीकांत यांच्याबरोबर अमरीश पुरी यांचा घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “अमरीश पुरी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी चेन्नईला गेले होते. तो सिनेमा रजनीकांत यांच्याबरोबर होता. मात्र, त्यावेळी रजनीकांत खूप मोठेपणा मिरवत असल्याचं डॅडींना वाटलं होतं. म्हणून त्यांनी निर्मात्यांना सिनेमामध्ये काम करण्यास नकार कळवला आणि रजनीकांतबरोबर काम करण्यास सोयीचं वाटत नसल्याचं निर्मात्यांना सांगून टाकलं. यानंतर रजनीकांत यांनी अमरीश पुरी यांची माफी मागितली होती आणि त्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं. त्यांनी ‘थलपती’ या चित्रपटात एकत्र काम केलं आणि त्यांच्यात चांगलं नातं निर्माण झालं.”

दरम्यान, अमरीश पुरी यांनी सिनेमातील खलनायकाच्या भूमिका प्रभावीपणे पडद्यावर साकारली होती.‘मिस्टर इंडिया’मधील ‘मोगॅम्बो’, ‘नगीना’, ‘तेजाब’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण अर्जुन’, ‘गदर’ आणि ‘राम-लखन’सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा संवाद, भारदस्त आवाज आणि अभिनयामुळे ते अजरामर कलाकार ठरले. १२ जानेवारी २००५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.