Rajinikanth on Aishwarya Rai: रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच काही हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.

आता रजनीकांत यांचा २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक तमिळ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. २५ वर्षांपूर्वी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले आणि पुरस्कारही जिंकले.

देशभरातील ८६ चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा १०० दिवस चालला. नंतर या चित्रपटाचा तेलुगूमध्ये ‘नरसिंहा’ या नावाने रिमेकही करण्यात आला. विशेष म्हणजे हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटाचे नाव पदयप्पा आहे. आता १२ डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांत काय म्हणाले?

अलीकडेच, रजनीकांत यांनी पदयप्पा या सिक्वेलची घोषणा केली. ज्याचे नाव नीलंबरी: पदयप्पा २ हे असणार आहे. आता पदयप्पा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होण्यापूर्वी, रजनीकांत यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी काही चित्रपटाच्या संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. रजनीकांत यांनी खुलासा केला की राम्या कृष्णन या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. तर ऐश्वर्या रायने या चित्रपटात काम करावे असे वाटत होते.

रजनीकांत म्हणाले, “आम्हाला ऐश्वर्या राय बच्चनने ही भूमिका साकारावी अशी इच्छा होती. खूप अडचणींनंतर आम्ही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जर ऐश्वर्या ही भूमिका साकारण्यासाठी तयार झाली असती तर मी दोन-तीन वर्षे वाट पाहण्यास तयार होतो. कारण ती भूमिकाच तशीच होती. ती भूमिका यशस्वी होणे खूप महत्वाचे होते.”

रजनीकांत पुढे म्हणाले, “आम्ही असे ऐकले होते की ऐश्वर्या रायला ही भूमिका साकारण्यामध्ये रस नव्हता. ऐश्वर्याच्या नकारानंतर, निर्मात्यांनी निलांबरीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींशी संपर्क साधला. मात्र, ज्या अभिनेत्रीच्या डोळ्यात ती चमक असेल, अशा अभिनेत्रीच्या शोधात संपूर्ण टीम होती.याचदरम्यान दिग्दर्शक के.एस. रविकुमार यांनी रम्या कृष्णनचे नाव सुचवले.

रजनीकांत यांनी असेही सांगितले केली की पदयप्पाचा दुसरा भाग ‘नीलंबरी: पदयप्पा २’ नावाचा सिक्वेल तयार होत आहे. ‘पदयप्पा’बद्दल बोलायचे झाले तर २१० प्रिंट आणि ७००,००० ऑडिओ कॅसेटसह जगभरात प्रदर्शित होणारा हा पहिला तमिळ चित्रपट होता. त्या वेळी तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. या चित्रपटाने पाच तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले. याबरोबरच, जागतिक स्तरावर ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा हा रजनीकांतचा पहिला चित्रपट मानला जातो.