scorecardresearch

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाबद्दल राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “त्यांना विषयाला…”

अक्षयच्या ‘केसरी’ चित्रपटाबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त करताना संतोषी म्हणाले…

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाबद्दल राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “त्यांना विषयाला…”
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला.

गांधी हत्येच्या सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. याच निमित्ताने राजकुमार संतोषी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी खास संवाद साधला.

आणखी वाचा : शाहरुख खानने ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’ आणि ‘कपिल शर्मा शो’च्या मंचावर येण्यास दिला नकार; ‘हे’ आहे कारण

या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटाबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त केली. संतोषी म्हणाले, “बॅटल ऑफ सारागढी नावाचा मी एक चित्रपट सुरू केला होता, २० दिवसाचं चित्रीकरणसुद्धा केलं होतं. या चित्रपटात माझ्याबरोबर अक्षय कुमार आणि करण जोहरसुद्धा जोडले गेले होते, पण काही कारणास्तव हा चित्रपट आम्हाला पूर्ण करता आला नाही. पुढील वर्षी मी त्याच विषयावर चित्रपट करणार आहे, कारण अक्षय कुमारने केलेल्या चित्रपटातून त्या विषयाला योग्य तो न्याय देता आलेला नाही असं मला वाटतं.”

राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाचं नाव समोर येत आहे. त्याबद्दल बोलताना राजकुमार संतोषी म्हणाले, “रणदीप हा खूप गुणी कलाकार आहे, चित्रपटाच्या विषयानुसार तो त्यासाठी मेहनत घेतो. त्याच्याबरोबर काम करायला मला खूप आवडेल.” संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थेट शाहरुख खानच्या ‘पठाण’शी टक्कर घेणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या