Rajkumar Santoshi On Ranveer Singh Dhurandhar Dialogue: चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी हे सध्या त्यांच्या ‘बटवारा १९४७’ सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. सनी देओल व त्यांची जबरदस्त हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे. सनी देओलच्या ‘घातक’, ‘गदर’, ‘घायल’ या सिनेमांतील डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन्सनी बॉलीवूडचा एक काळ गाजवला होता. त्यानंतर यातील एक डायलॉग आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’मध्ये वापरण्यात आला. त्याबाबत आता राजकुमार संतोषी यांनी मत व्यक्त केलं आहे.
‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’ची कथा, अॅक्शन आणि रणवीर सिंहचा अभिनय यांमुळे या सिनेमानं तुफान यश मिळवलं. त्यामध्ये रणवीर सिंहनं ‘घायल हूं, इसीलिए घातक हूं’ असा डायलॉग मारला. योग्य वेळी योग्य जागी रणवीरचा हा डायलॉग ऐकून प्रेक्षकांना जुन्या बॉलीवूड सिनेमांची आठवण झाली. या डायलॉगबाबत आता’घातक’ व ‘घायल’ सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्यासाठी फक्त हा डायलॉगचा वापर नाही, तर एक सन्मान असल्याच्या भावना राजकुमार संतोषींनी व्यक्त केल्या आहेत.
‘धुरंधर’मध्ये ‘घायल’चा डायलॉग
‘धुरंधर’मध्ये ‘घायल’मधील डायलॉग वापरण्याबाबत विचारले असता, संतोषी म्हणाले, “हो, चित्रपटात हा डायलॉग वापरला जाणार असल्याची माहिती मला मिळाली होती. हा डायलॉग चित्रपटात योग्य पद्धतीनं वापरण्यात आला, याचा मला खूप आनंद झाला.”
आदित्य धर हे एक चांगले दिग्दर्शक – राजकुमार संतोषी
पुढे ते म्हणाले, “माझ्यासाठी, फक्त माझ्या डायलॉगचा वापर केलाय, असं नव्हतं. तर माझ्या सिनेमांचा जो वारसा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही भावना होती. सिनेमात हा डायलॉग वापरून माझा सन्मान केला. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी कौतुक करतो आणि त्यांना असं यश यापुढेही मिळत राहो, अशा शुभेच्छा देतो. आदित्य धर हे एक चांगले दिग्दर्शक आहेत आणि भविष्यातही त्यांनी अशाच उत्तम चित्रपटांची निर्मिती करावी, अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान, राजकुमार संतोषी यांचे हिंदी सिनेमात विशेष योगदान राहिलं आहे. त्यांनी ‘दामिनी’, ‘घायल’, ‘घातक’, ‘अंदाज अपना अपना’ असे अनेक जबरदस्त सुपरहिट सिनेमे दिले आहेत. राजकुमार संतोषी व सनी देओलच्या जोडीनं बॉलीवूड गाजवलं होतं. अॅक्शन आणि भावनिक कथा यांची सांगड घालून राजकुमार संतोषी यांनी वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार केले होते. त्यानंतर आता त्यांचा बटवारा १९४७ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, लवकरच ते ‘घातक घुस के मारेगा’ या सिनेमावर काम करणार आहेत.
