Rajkumar Santoshi reply to Shabana Azmi Batwara 1947: राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नाही. सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा फ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी सनी देओलला मुस्लीम पात्रात न स्वीकारल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं मत शबाना आझमींनी व्यक्त केलं होतं. पण आता सिनेमाच्या दिग्दर्शकांनी असं म्हणणं अजिबात योग्य नसून समाज आता पूर्वीपेक्षा जास्त सहनशील झाल्याचं मत व्यक्त केलं.

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार संतोषी यांनी ‘बटवारा १९४७’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत मत व्यक्त केलं. तसेच शबाना आझमी यांनी सनी देओलच्या मुस्लीम पात्राबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राजकुमार संतोषी म्हणाले, “मला या बोलण्यात काहीच अर्थ वाटत नाही. अमिताभ बच्चन यांनी १९८३ मध्ये आलेल्या ‘कुली’ चित्रपटात मुस्लीम नायकाची भूमिका साकारली होती. मनमोहन देसाई यांच्या अनेक चित्रपटांत मुस्लीम अभिनेते होते. आपण अशा टप्प्यावर आलो आहोत का, जिथं आपल्याला दुसऱ्या धर्मातील हिरो स्वीकारता येत नाही? आपण समजूतदार, संवेदनशील आणि सुशिक्षित लोक आहोत. मग चित्रपटात ही मोठी चूक आहे, असं कसं म्हणू शकता?”

पूर्वीपेक्षा खूपच कमी सहनशील आणि समावेशक – राजकुमार संतोषी

पुढे ते म्हणाले, “एक समाज म्हणून आपण पूर्वीपेक्षा खूपच कमी सहनशील आणि समावेशक झालो आहोत. तुम्ही चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय आहे आणि लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे, हे पाहिलं पाहिजे.”

मी हिंदू अन् माझ्या मुलाचं नाव राम

राजकुमार संतोषी पुढे म्हणाले, “मी हिंदू आहे. मी मंदिरात जातो. माझ्या मुलाचं नाव राम आहे. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण मला प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत. संतांनी नेहमी समानतेची शिकवण दिली आहे. हिंदू धर्माने नेहमीच सर्वांना सामावून घेतलं आहे, कोणाला लांब ठेवण्याबद्दल सांगितलं जात नाही.”

‘बटवारा 1947’बाबत काय म्हणालेल्या शबाना आझमी?

‘झूम’शी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या, “खरं तर ‘बटवारा १९४७’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण माझ्या आजूबाजूचे लोक मला येऊन सांगतात की त्यांना चित्रपट खूप आवडला. पण दुसरीकडे, लोक थिएटर्समध्ये गेलेच नाहीत आणि जे गेले त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच होत्या. मूळ मुद्दा असा आहे की लोक सनी देओलला मुस्लीम म्हणून स्वीकारू शकत नाहीत. ‘कुली’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी अत्यंत सहजतेने मुस्लीम पात्रे साकारली होती. ‘दीवार’ चित्रपटात त्यांनी ७८६ बिल्ला लावला होता आणि लोकांनी तो स्वीकारला होता. मग आता आपण काय समजायचं? जाणूनबुजून असं वातावरण तयार केलं जातंय का? हेच मला समजत नाहीये.”

दरम्यान, ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. ‘गदर’ आणि ‘घातक’नंतर राजकुमार संतोषी आणि सनी देओलची जोडी पुन्हा एकत्र आल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ५३ कोटी रुपयांची कमाई केली.