Rajkummar Rao Weight Loss Transformation: चित्रपटातील एखादी भूमिका अधिक प्रभावी आणि वास्तववादी वाटावी यासाठी अनेक कलाकार आपल्या शरीरयष्टीत मोठे बदल करतात. काही कलाकार भूमिकेच्या गरजेनुसार वजन कमी करतात, तर काही जण वजन वाढवतात. यासाठी ते आहारात बदल करण्यासोबतच व्यायाम, वर्कआउट आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आधार घेतात. काही भूमिकांसाठी कलाकारांना काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वजन कमी करावे लागते, तर काही व्यक्तिरेखांसाठी वजन वाढवून विशिष्ट लूक मिळवावा लागतो. अभिनेता राजकुमार रावने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित २०१७ मधील ‘बोस: डेड/अलाइव्ह’ या वेब सीरिजसाठी तब्बल १३ किलो वजन वाढवले होते, पण त्यापैकी १० किलो वजन त्याने फक्त एका महिन्यात कमी केलं होतं.

या सीरिजच्या शूटिंगनंतर लगेचच, राजकुमारने २०१८ मध्ये आलेल्या ‘फन्ने खान’ चित्रपटासाठी अवघ्या एका महिन्यात तब्बल १० किलो वजन घटवलं होतं. २०१७ मध्ये ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला होता. वजन कमी करण्यासाठी काय केलं होतं, डाएट प्लॅन कसा होता, याबद्दल स्वतः राजकुमार रावने माहिती दिली होती. “मला सीरिज संपल्यानंतर हे वाढवलेलं अतिरिक्त वजन कमी करावंच लागणार आहे, याची मला कल्पना होती,” असं राजकुमार राव म्हणाला होता.

राजकुमार रावचा डाएट प्लॅन कसा होता?

राजकुमारने वजन कमी करण्यासाठी त्याचा डाएट प्लॅन कसा होता, ते सांगितलं होतं. “मी नाश्ता आणि दुपारचं जेवण पूर्णपणे बंद केलं होतं. मी थेट रात्रीच जेवायचो. त्यातही प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असायचा. मी सतत कामात व्यग्र असल्याने मला दिवसा भूकेची जास्त जाणीव व्हायची नाही. व्यायामाबाबत बोलायंच झाल्यास, मी दररोज कमीत कमी तीन तास कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करत होतो,” असं राजकुमार रावने म्हटलं होतं. त्या वर्षीच्या दिवाळीतही राजकुमारला डाएट करावे लागले होते.

दरम्यान, राजकुमार राव लवकरच भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली याच्या ‘दादा’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लुक गांगुलीच्या ५४ व्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाची निर्मिती करत असून, विक्रमादित्य मोटवानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.