Rajkummar Rao On Sourav Ganguly Biopic poster trolling : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव हा सध्या त्याच्या बायोपिक सिनेमांमुळे चर्चेत आला आहे. लवकरच त्याचा २६/११ दहशवादी हल्ल्याच्या खटल्यावर आधारित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ सिनेमा रिलीज होणार आहे. याचबरोबर राजकुमार राव याचा भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ सिनेमा येणार आहे. सौरव गांगुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. मात्र, खराब एडिटिंगमुळे जबरदस्त ट्रोल झाल्यानंतर आता राजकुमार रावने घाई केल्याची कबुली दिली आहे.
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकुमार रावने दादा सिनेमाबाबत अपडेट शेअर केली. तसेच शूटिंगबाबत खुलासा केला. राजकुमार राव म्हणाला, “मी सौरव गांगुलींना अनेकदा भेटलो आहे आणि त्यांच्या घरी तसेच ईडन गार्डन्समध्ये शूटिंग केले आहे. सिनेमासाठी आम्ही काही वेळ कोलकात्यामध्ये होतो आणि त्यावेळी मी दादांबरोबर खूप वेळ घालवला आहे. यावेळी आम्ही दोघांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. अशा काही गोष्टींवर आमचे बोलणे झाले, जे आता उघडपणे सांगू शकत नाही.”
त्यांचे आयुष्य माझ्यासमोर उलगडून दाखवले – राजकुमार राव
पुढे राजकुमार राव म्हणाला, जर एखादी व्यक्ती आणि त्याचे मन समजून घ्यायचे असेल तर त्याच्यासंबंधित वैयक्तिक गोष्टीही जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. माझ्याबरोबर या गोष्टी शेअर करताना ते खूप मोकळेपणाने बोलले. त्यांनी त्यांचे आयुष्य माझ्यासमोर उलगडून दाखवले. आम्ही सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतो, ते एक दिग्गज (लेजेन्ड) आहेत. आज भारतीय संघ ज्या स्थितीत आहे, याचा पाया त्यांनीच रचला आहे.”
८ जुलै रोजी सौरव यांच्या वाढदिवसानिमित्त, ‘दादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्टर प्रदर्शित केले. यामध्ये राजकुमार रावने सौरव गांगुली यांच्या ऐतिहासिक शर्टलेस सेलिब्रेशनचा लूक रिक्रिएट केलेला दिसून आला. पण, या पोस्टरवरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. हे पोस्टर आर्टिफिशल इंटिलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. याबाबत राजकुमार राव म्हणाला, “ज्यांनी ते पोस्टर तयार केले होते, त्यांना आता जाणीव झाली आहे. या घटनेतून त्यांनी धडा घेतला आहे. त्यांना समजले आहे की, कोणतीही घाईगडबड न करता ठराविक व पुरेसा वेळ घेणे खूप गरजेचे आहे. मला वाटते की टीमने यातून धडा घेतला आहे. पण, त्यांना हे देखील समजले आहे की ‘दादां’चा प्रचंड मोठा चाहता वर्ग असून तो खूप उत्साही आहे.”
