Non Bailable Warrant Against Ameesha Patel : चेक बाउन्सच्या एका जुन्या प्रकारणामुळे तिहार तुरुंगातून अभिनेता राजपाल यादवला नुकताच जामीन मिळाला असताना दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल झाले आहे. जवळपास १० वर्षे जुनं हे प्रकरण पुन्हा वर आलं आहे. अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट कोणी दाखल केलं आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
‘नवभारत टाईम्स’च्या वृत्तानुसार १० वर्षांपूर्वी अमीषा पटेलच्या विरोधात वॉरंट दाखल झालं होतं. मुरादाबाद येथील एका कार्यक्रमामुळे अभिनेत्रीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली. अशातच आता १६ फेब्रुवारी रोजी सोमवारी एसीजेएम-५ च्या कोर्टकडून अभिनेत्री अमीषा पटेलच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आलं आहे.
१० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
कोर्टाकडून दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने हे समन्स देण्यात आल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे आता अभिनेत्रीला कोर्टाने नवीन तारीख देऊन हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अमीषा पटेलशी जोडलेलं हे प्रकरण १० वर्षे जुनं आहे. २०१७ मध्ये मुरादाबाद कोर्टात एक तक्रार दाखल करण्यात आलेली. त्या शहरातील एका इव्हेंट कंपनीने ही तक्रार दाखल केलेली, ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं की अमीषा पटेलने २०१७ मध्ये एका लग्नात सादरीकरण करण्याचे ११ लाख रुपये घेतलेले. परंतु, इतके पैसे घेतल्यानंतरही अभिनेत्रीने सादरीकरण केलं नाही.
अमीषाने ११ लाख रुपये घेतल्यानंतरसुद्धा लग्नात सादरीकरण न करताच ती दिल्लीहून मुंबईला परतल्याचं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, सादरीकरण करण्यासाठी अमीषा मुंबईहून दिल्लीत आलेली, परंतु तिथे पोहोचल्यानंतर तिने अजून दोन लाख रुपयांची मागणी केली, जे देण्यास इव्हेंट कंपनीने नकार दिला. तक्रार अशी आहे की, यानंतर अमीषा सादरीकरण न करताच मुंबईला परतली. याला वैतागून इव्हेंट कंपनी चालवणारे पवन वर्मा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.
अभिनेत्रीविरुद्ध मुरादाबाद न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी, ४०६,५०४ आणि ५०६ अंतर्गत खटला सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी मुरादाबाद येथे येऊन अमीषा पटेलने जामीनही मिळवला होता. मात्र, त्यानंतर तिने जामीनाच्या अटींचे पालन केले नसल्याचा आरोप आहे, त्यामुळे न्यायालयाने तिच्या विरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अॅडव्होकेट पंकज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करत अमीषा पटेलला २७ मार्च रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
