Rajpal Yadav Bother On Financial Help : चेक बाउन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादव सध्या चर्चेत आहे. राजपाल यादव आर्थिक अडचणीत असून २५ लाखांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. राजपालनं एका चित्रपटासाठी कर्ज घेतलं होतं आणि तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर घेतलेलं कर्ज फेडण्यात तो अपयशी ठरला होता. याच प्रकरणी आता त्यानं आत्मसमर्पण केलं.

या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला इंडस्ट्रीतून मदत केली जात आहे. अभिनेत्याच्या मदतीसाठी बॉलीवूडमधील कलाकाराने मदतीचं हात दिला आहे. यात सोनू सुद, सलमान खान, अजय देवगण, वरुण धवन, गुरू रंधावा, गुरमित चौधरी, केआरकेसह काही नावांचा समावेश आहे.

राजपाल यादवसाठी सोशल मीडियाद्वारेही मदत केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. पण अभिनेत्याच्या भावाने म्हटलंय की ही मदत त्याला अजून मिळालेलीच नाहीय. राजपाल यादवचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी मदत पोहोचलीच नसल्याचं सांगितलंय.

कुणीही मदत केली नाही…

दैनिक भास्करशी बोलताना श्रीपाल यादव म्हणाले, “आतापर्यंत कोणीही राजपालला आर्थिक मदत केलेली नाही. जर लोकांनी मदत केली असेल तर कृपया पैसे कुठे दिले गेले ते आम्हाला सांगा. जर कोणी मदत केली असेल तर पैसे कुठे दिले गेले? ते कोणाला दिले गेले? कुटुंबाला याची माहिती का नाही? ज्यांनी खरच मदत केली असेल, त्यांच्याबद्दल कुटुंब आभारी आहे. पण या मदतीबद्दल फक्त सोशल मीडियावरच वक्तव्यं केली जात आहे. हे चुकीचं आहे. सोनू सूदच्या मदतीबद्दल मला खात्री आहे. तो नक्कीच मदत करेल.”

भाऊ राजपाल यादवने चित्रपटात गुंतवणूक केल्याबद्दल श्रीपाल यादव यांनी सांगितले, “एका व्यावसायिकाने त्यांच्या मुलाला चित्रपटात घेण्याचे आश्वासन दिले होते. हे पैसे चित्रपटासाठी गुंतवणूक म्हणून देण्यात आले होते, कर्ज किंवा व्याज म्हणून नाही. पण गुंतवणुकीची रक्कम असलेली कागदपत्रे न वाचता राजपालने त्यावर सही केली. आता याला त्याची चूक म्हणा किंवा त्याचा साधेपणा.”

दरम्यान, कुटुंबात आनंदाचं वातावरणही आहे. श्रीपाल यादव यांच्या मुलीचं लग्न होत आहे आणि कुटुंबाला आशा आहे की, राजपाल या लग्नात सहभागी होतील. याबद्दल श्रीपाल यादव म्हणाले, “कुटुंबातला व्यक्ती आर्थिक संकटात अडकला आहे याबद्दल काळजी आहेच. पण आम्ही खरे आहोत. त्यामुळे तो यातून नक्कीच बाहेर येईल. सध्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, राजपाल बाहेर येतील आणि माझ्या मुलीच्या लग्नात ते सहभागी होतील.”

नेमकं प्रकरण काय आहे?

२०१० मध्ये राजपाल यादवने ‘अता पता लापता’ नावाच्या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यामुळे राजपाल यादवचं नुकसान झालं. यामुळे झालेलं कर्ज राजपाल फेडू शकला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवार (१६ फेब्रुवारी) रोजी होणार आहे.