Rajpal Yadav Check Bounce Case : अभिनेता राजपाल यादवला चेक बाउन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी १.१५ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, उर्वरित ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी न्यायालयाने अभिनेत्याला १३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांत होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज, राजपाल यादवने चेक बाउन्स प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आल्याविरोधात आणि ३ महिन्यांच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. राजपाल यादव यावेळी न्यायालयात हजर होता. न्यायमूर्ती बागची यांनी त्यांना फटकारलं आणि सांगितलं की, जर अभिनेत्याने आपलं वर्तन असंच चालू ठेवलं तर न्यायालय त्याची शिक्षा वाढवेल.
राजपाल यादवने सरन्यायाधीश (CJI) यांच्या खंडपीठाला सांगितलं, “अता पता लापता’ या चित्रपटामुळे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे माझे १७ कोटी बुडाले आहेत. तुम्हाला जिथे हवं तिथे तुम्ही मला पाठवू शकता, मी तयार आहे. एकूण २२ कोटी खर्च झाले, मात्र या चित्रपटातून एक रुपयाचीही कमाई झाली नाही. हा चित्रपट एकाही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही.” यावर सरन्यायाधीश म्हणाले, “जसा तुमचा ‘अता पता लपता’ चित्रपट बुडाला, तसेच तुमचे पैसेही बुडाले.”
न्यायालयाने राजपाल यादवला उर्वरित ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. यानंतर राजपाल यादवने न्यायालयात १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट जमा केला, तो रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण जवळपास १६ वर्षे जुनं आहे. तक्रारदार कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०१० मध्ये राजपाल यादव यांना त्यांच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी जवळपास ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीशी संबंधित असल्यामुळे राजपाल यादव यांच्यावर ही रक्कम परत करण्याची जबाबदारी होती. या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेले १.०५ कोटी रुपयांचे ७ चेक बाऊन्स झाले, ज्यावरून तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, १३ ऑक्टोबरपर्यंत उर्वरित रक्कम जमा केल्यानंतरच त्यांच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकेवर विचार केला जाईल.
