Rajpal Yadav Cheque Bounce Case : चेक बाऊन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादवला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. या प्रकरणी सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती स्वराणा कांत शर्मा यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार न्यायालयाने नमूद केले की, राजपाल यादवने अनेक वेळा थकबाकीची रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याने ते पूर्ण केले नाही. किमान दोन डझन वेळा त्याने पैसे देण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात रक्कम जमा झाली नाही.
त्यावर न्यायमूर्ती शर्मा म्हणाल्या, “तुम्ही (राजपाल यादव) स्वतः पैसे देऊ, असं दिलेलं आश्वासन पाळलं नाही. म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावं लागलं.”
राजपाल यादव प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी
याआधी राजपालच्या वकिलांनी तक्रारदाराला थेट पैसे देऊ, असे सांगितले होते. मात्र आता ती रक्कम न्यायालयात जमा करू, असे सांगितले जात आहे. राजपालच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे अभिनेत्याचा तुरुंगातील मुक्काम चार दिवस वाढला आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी करणार आहे.
राजपालने ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्याचा त्याला मोठा आर्थिक फटका बसला.
या प्रकरणी इंडस्ट्रीतून राजपालला पाठिंबा मिळत आहे. त्याचा मॅनेजर गोल्डीने सलमान खान, अजय देवगण, डेव्हिड धवन, सोनू सूद व वरुण धवन यांसारख्या कलाकारांनी मदत केल्याचे सांगितले. तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी मदत मागितली होती का, या प्रश्नावर गोल्डीने उत्तर देण्यास नकार दिला. मात्र, इंडस्ट्री त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे त्याने सांगितले.
दरम्यान, राजपालने त्याच्या जुन्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ही रक्कम कर्ज नव्हती, तर गुंतवणूक होती. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत राजपाल म्हणालेला, “एका व्यावसायिकाने मला पाच कोटी रुपये दिले. मी ते कर्ज म्हणून घेतले नव्हते. त्यांनी चित्रपटासाठी गुंतवणूक केली होती, कारण- त्यांना त्यांच्या नातवाला अभिनेता म्हणून लाँच करायचे होते.”
