Rajpal Yadav first reaction after coming out of Jail: बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव चेक-बाउन्स प्रकरणात मागील १० दिवसांपासून तिहार तुरुंगात होता. अखेर मंगळवारी (१७ फेब्रुवारी) त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सोमवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. राजपाल यादवने तक्रारदाराच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपये जमा केल्यानंतर त्याला जामीन मिळाला. न्यायालयाने त्याला त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे आणि परवानगीशिवाय देश सोडू नये, या अटीवर जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादव म्हणाला…

तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादवने माध्यमांशी संवाद साधला. “मला २०२७ मध्ये बॉलीवूडमध्ये ३० वर्षे होतील. या देशातील लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळेच मी इतकी वर्षे इथे टिकू शकलो. हे प्रकरण २०१२-१३ चं आहे. आतापर्यंत मी २५० चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमधील सर्वजण माझ्याबरोबर आहे. या देशातील प्रत्येक व्यक्ती, मग ते लहान मूल असो, तरुण असो किंवा वृद्ध सर्वजण माझ्याबरोबर आहेत. मी न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहिलो आहे आणि यापुढेही राहीन. सोशल मीडियावर मला खूप प्रेम मिळत आहे. या देशातील १५० कोटी लोकांशी माझं नातं आहे. माझ्यावर कोणताही आरोप असेल तर त्याचं उत्तर देण्यास मी कायम उपलब्ध असेन. तुम्ही मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली, त्यासाठी उच्च न्यायालयाचे आभार,” असं राजपाल यादव म्हणाला.

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवला जामीन मंजूर करण्यात आला. पण नियमानुसार संध्याकाळी कैद्याची सुटका होत नाही, त्यामुळे जामीन मिळूनही राजपाल यादवला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली. आज त्याची तुरुंगातून सुटका झाली असून लोकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल त्याने आभार मानले.

Award Banner

पाहा राजपाल यादवचा व्हिडीओ

राजपाल यादवच्या पुतणीचं लग्न आहे. त्यासाठी त्याने कोर्टात जामीन मागितला होता. त्याने दीड कोटी रुपये तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा केल्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. राजपाल यादवचा भाऊ श्रीपाल यादव म्हणाला, “तो येणार नसेल तर लग्न होऊ शकणार नाही. तो कुटुंबातून महत्त्वाचा सदस्य आहे. लग्नाची तयारी सगळी झाली आहे. पण अचानक हे सगळं घडलं. त्याला वाटत होतं की आत्मसमर्पण केल्यानंतर तो लग्नाला येऊ शकणार नाही. पण आता त्याची सुटका झाली आहे. तो लग्नाला येईल. आम्ही खूप खूश आहोत. देवाचे आभार की त्याची सुटका झाली. त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.”