Rajpal Yadav personal life : ‘भूल भुलैया’सह अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व राजकारणी त्याला आर्थिक मदत करत आहेत. राजपाल यादवने दोन दशकांहून अधिक काळापासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. राजपालने अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या राजपालने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे.
राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं निधन
राजपालने दोन लग्नं केली आहेत. राजपालच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्याला पहिल्या पत्नीपासून ज्योती नावाची मुलगी आहे. मुलीच्या जन्मावेळीच त्याची पत्नी अरुणाचा मृत्यू झाला होता. “माझ्या वडिलांनी वयाच्या २० व्या वर्षी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर माझ्या पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला, तेव्हाच तिचं निधन झालं. मी तिला भेटायचं ठरवलेलं तेव्हा मी तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात होतो. मी माझ्या कुटुंबाचे, माझ्या आईचे, माझ्या वहिनीचे आभार मानतो, माझ्या मुलीला तिची आई नाही, असं कधीच त्यांनी जाणवू दिलं नाही. सर्वांनी तिला खूप प्रेमाने वाढवलं,” असं राजपाल यादवने सांगितलं होतं. २०१७ मध्ये राजपाल यादवच्या मुलीचं लग्न झालं.
पत्नीच्या निधनानंतर अभिनयात आला राजपाल यादव
पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपाल यादव खचला होता. पण त्याने आयुष्यात काहीतरी करायचं ठरवलं. १९९१ मध्ये पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने अभिनय करायचं ठरवलं. त्याला इंडस्ट्रीत नाव कमवायला १३ वर्षे लागली. त्याने एनएसडीमध्ये शिक्षण घेतले, टीव्ही आणि चित्रपट केले.
कॅनडात भेट अन् दुसरं लग्न
राजपालने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यावर दुसरं लग्न केलं. त्याची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. राजपाल त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला होता, तोही अवघ्या १० दिवसांत. तो सनी देओलबरोबर ‘द हीरो’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. २००२ मध्ये तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. तेव्हा तो राधाला भेटला. राधा व राजपाल एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून कॅनडातील एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते.
कॉफी शॉपमध्ये दोघांनी गप्पा मारल्या, त्यानंतर राजपाल १० दिवस राधाच्या संपर्कात होता. यानंतर दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. राजपाल १० दिवसांनी भारतात परतला, नंतर फोनवरून ते एकमेकांशी बोलायचे. असेच १० महिने गेले. त्यानंतर राजपाल आणि राधा या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००३ मध्ये लग्न केलं. राजपाल यादवला राधापासून दोन मुली आहेत. बरेचदा तो पत्नी व मुलींबरोबरचे फोटो शेअर करत असतो.
राधा त्याच्यापेक्षा एक इंच उंच आहे. तसेच ती त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. असं राजपाल यादवने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

