Rajpal Yadav Fitness Mantra : राजपाल यादव बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यानं प्रेक्षकांचं त्याच्या विनोदी शैलीनं मनोरंजन केलं आहे. राजपाल अलीकडेच त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. चेक बाऊन्स प्रकरणातून काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला आहे.
अशातच आता राजपाल यादवनं ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली आहे. यामधून त्यानं त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल आणि उपवास करण्याबद्दल सांगितलं आहे. राजपाल यादवनं या मुलाखतीमधून जितकं कमी आपण अन्नाचं सेवन करू तितकं शरीरासाठी चांगलं असतं असं म्हटलं आहे. राजपाल नेमकं काय म्हणाला, तसंच कोणते पदार्थ त्याला आवडतात, त्याचा आहार कसा असतो आणि तो आरोग्याची काळजी कशी घेतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
योग्य आहार घेण्याबद्दल राजपाल यादवची प्रतिक्रिया
राजपाल यादवनं तो मंगळवारी उपवास करतो असं सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी आठवड्यातून एकदा उपवास करतो. आधी सोमवारी ठेवायचो, नंतर बुधवारी ठेवायला लागलो; आता मंगळवारी असतो. सहा दिवस जेवण करायचं आणि एक दिवस काहीच खायचं नाही. डिटॉक्सिफिकेशन करायचं. मला असं वाटतं की, भोजन म्हणजे भजन, जे सगळ्यांबरोबर केलं पाहिजे पण एकांत असला पाहिजे; म्हणजे शांती असली पाहिजे. आपल्या पोटात अन्नासाठी खूप कमी जागा आहे, जितकं कमी खाणार तितकं जास्त निरोगी राहाल असं मला वाटतं.”
राजपाल पुढे म्हणाला, “प्रत्येकानं एक पोळी कमी खाल्ली पाहिजे. त्याचा शरीराला फायदा होतो. अधिक प्रमाणात जेवण केल्यामुळे ९९ टक्के अपचनाच्या समस्या होतात.” मुलाखतीत राजपालची पत्नी राधा यादवला त्याचा आवडता पदार्थ कोणता आहे याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “रसमलाई, मध्य रात्री उठवून जरी रसमलाई खायला दिली तरी तो खाईल.”
राजपालच्या फिटनेसबद्दल विचारल्यानंतर राधा म्हणाल्या, “त्यामागचं कारण योगा आहे, पण तो चहा पिऊन भूक मारतो. दिवसाला तो १२-१३ कप चहा पितो. गेली कित्येक वर्षे तो चहा सोडणार किंवा कमी करणार असं बोलत आहे, पण करत नाहीये.” राजपाल यावर “हो, ती सवय मला मोडायची आहे” असं म्हणाला.
दरम्यान, राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणाला तुम्ही कशा सामोरे गेल्या असं विचारल्यानंतर त्याची पत्नी म्हणाली, “त्यावेळी खूप काही घडत होतं, त्याचवेळी घरात लग्नसुद्धा होतं, लहान मुलं आहेत घरात, त्यामुळे मी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं तुरुंगातून लवकर बाहेर येणं महत्त्वाचं होतं. मुलगी मोठी असल्यानं तिला याबद्दल थोडी माहिती आहे, पण मुलगा लहान असल्यानं त्याला अजूनही काही गोष्टी कळल्या नाहीयेत.”
