Priyadarshan Reaction on Rajpal Yadav Case : राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. नऊ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली असून, त्याला कुठलाही दिलासा मिळाला नाही. उलट पैसे परत देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे न्यायालयाने त्याला फटकारले.

राजपालला मदत करण्यासाठी बॉलीवूडमधील काही कलाकार पुढे आले आहेत. त्यात सलमान खान आणि अजय देवगण, सोनू सूदसह इतर कलाकारांचाही समावेश आहे. दरम्यान, दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी नुकतीच राजपालबद्दल प्रतिक्रिया दिली.

राजपालने प्रियदर्शन यांच्याबरोबर ‘मालामाल वीकली’, ‘भागम भाग’, ‘चुप चुप के’, ‘दे दना दन’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. राजपालवरील आर्थिक संकटामुळे त्यांनी अभिनेत्याला अनेक चित्रपटांत काम दिलं असल्याचं कबूल केलं.

माझ्या बहुतेक चित्रपटांत काम केलंय : दिग्दर्शक प्रियदर्शन

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी सांगितलं की, या कठीण काळात त्यांनी राजपालचं मानधन वाढवले आहे आणि ते त्याला शक्य ती सर्व मदत करणार आहेत. ते म्हणाले, “मी राजपालला २० वर्षांहून अधिक काळापासून ओळखतोय. माझा त्याच्याबरोबरचा पहिला चित्रपट ‘मालामाल वीकली’ हा होता. त्यानंतर त्यानं माझ्या बहुतेक चित्रपटांत काम केलं आहे. माझ्या पुढील चित्रपटाच्या निर्मात्यांना (ज्युबिली फिल्म्स) मी सांगितलं आहे की, राजपालला त्याच्या सध्याच्या मानधनापेक्षा जास्त पैसे द्यावेत. निर्मात्यांनीही माझी विनंती मान्य केली आहे.”

राजपाल मनाने खूप चांगला आहे : दिग्दर्शक प्रियदर्शन

ते पुढे म्हणाले, “मला राजपालच्या आर्थिक अडचणींबद्दल माहिती होती. म्हणूनच मी त्याला प्रत्येक चित्रपटात काम दिलं. जाहिरातींमध्येही त्याला संधी दिली. कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली; पण राजपाल मनानं खूप चांगला आहे.”

राजपालनं अनेक वेळा थकबाकीची रक्कम भरण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानं ते पूर्ण केलं नाही. किमान दोन डझन वेळा त्यानं पैसे देण्याचं लेखी व तोंडी आश्वासन दिलं; पण प्रत्यक्षात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळेच त्याला तुरुंगात जावं लागलं’, असं न्यायालयानं म्हटलं. दरम्यान, राजपालच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.