Nawazuddin Siddiqui on Rajpal Yadav: बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव काही दिवसांपासून चर्चेत आहे. १९९९ ला प्रदर्शित झालेल्या शूल या चित्रपटातून अभिनेत्याने पदार्पण केले होते.

विनोदी व्यक्तिरेखांसाठी राजपाल यादवला ओळखले जाते. दिल क्या करे, मुझसे शादी करोगी, एक और एक ग्यारह, वक्त, पहेली, मैंने प्यार क्यूँ किया, कूली नंबर १, फिर हेरा फेरी, चूप चूप के, छोटा पंडित, फिर हेरा फेरी, ढोल, पार्टनर अशा अनेक चित्रपटांतून राजपाल यादवने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्याने त्याच्या भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले.

“पाच वर्षे केवळ…”

द लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवबद्दल वक्तव्य केले होते. अभिनेता म्हणालेला, “मी आणि राजपालने पाच वर्षे केवळ अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. म्हणूनच, मला वाटते की, संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये राजपाल आणि माझे सर्वांत जास्त शिक्षण आहे.”

राजपाल हा माणूस म्हणून उत्तम आहे, असे सांगत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता, “तो एक उत्तम व्यक्ती आहे. जेव्हा राजपालला चांगल्या भूमिका मिळू लागल्या, त्यावेळी आम्ही अजूनही संघर्ष करत होतो. त्यावेळी संघर्ष करत असलेल्या कलाकारांना तो मदत करत असे. तेव्हा बरेच लोक त्याच्या घरी जेवत असत. त्याच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असत. तो विनोदी भूमिका साकारतो; पण प्रत्यक्षात तो खूप संवेदनशील व्यक्ती आहे”, असे म्हणत नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवचे कौतुक केले होते.

काही दिवसांपासून चेक बाऊन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादव मोठ्या चर्चेत आहे. वारंवार दिलेल्या मुदतीचे उल्लंघन केल्यानंतर अभिनेत्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानंतर अभिनेता तुरुंगात होता. यादरम्यान, इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्याला मदत करण्यासाठी पुढे आले होते. त्यामध्ये सोनू सूदपासून ते अजय देवगण, सलमान खान यांचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीनेदेखील मदत केली होती; पण त्यांनी याबद्दल कुठेही सांगितले नाही. नुकताच राजपालला अंतरिम जामीन मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादवने २०१० मध्ये ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून पाच कोटींचे कर्ज घेतले होते. अता पता लापता या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. मात्र, हा चित्रपट अपयशी ठरला आणि त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले. त्यानंतर तो कर्ज फेडू शकला नाही. या प्रकरणात मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरुद्ध अनेक चेक बाऊन्स झाल्याबद्दल आणि त्यांचे पैसे परत न केल्याबद्दल केस दाखल केली.

२०१८ मध्ये दिल्लीतील दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवत अभिनेत्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना आव्हान दिले. त्यानंतर शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली; मात्र अभिनेत्याने वारंवार दिलेल्या मुदतीचे पालन केले नाही.