राजपाल यादवला सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने ९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. राजपालला जामीन मिळाल्यानंतर त्याचे वकील भास्कर उपाध्याय यांनी या प्रकरणाबद्दल भाष्य केलं आहे. तक्रारदारांचा हेतू चांगला नसल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. तक्रारदारांना राजपालला तुरुंगात पाहायचंय, त्यामुळे हे प्रकरण पैशांबद्दल नाही, अशी शंका वकिलांनी उपस्थित केली आहे.
ईटाइम्सशी बोलताना भास्कर यांनी राजपाल यादव आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असल्याचं म्हटलं. राजपाल यादव वकील नाही. त्याला कायदेशीर बाबी समजत नाही. त्यामुळे जे कर्ज आहे, ते फेडणार असल्याची ग्वाही त्याने कोर्टात दिली होती. ज्या चित्रपटासाठी पैसे घेतले होते, त्यावर राजपालने जवळचे पैसेही खर्च केले. चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यालाही फटका बसला आणि आर्थिक अडचणी आल्या.
राजपाल यादवने मालमत्तेची कागदपत्रे जमा केली
तक्रारदारांचा हेतू वाईट असल्याचा आरोप करत भास्कर म्हणाले, “हा मुद्दा फक्त तक्रारदाराच्या पैशांबद्दल नाही, कारण राजपालने त्याच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे आधीच जमा केली आहेत. मालमत्ता सुमारे ४० कोटी रुपयांची आहे. तक्रारदाराने म्हटलं की आम्हाला कागदपत्रे नको, तर राजपालला तुरुंगात पाठवण्याचे आदेश द्या. राजपालने त्याच्या मूळ मालमत्तेची कागदपत्रे दिली होती. माझ्या मालमत्तेची किंमत ४० कोटींपेक्षा जास्त आहे, असं म्हणत राजपालने ती न्यायालयासमोर सादर केली,” असंही राजपालच्या वकिलांनी नमूद केलं.
५ कोटींचं कर्ज नाही तर गुंतवणूक
राजपालच्या थकबाकीबद्दल बोलताना भास्कर म्हणाले, त्याने २.५ कोटी रुपयांची व्यवस्था आधीच केली आहे. राजपालला ५ कोटी रुपये परत करायचे होते, त्यामुळे तो प्रचंड दबावाखाली होता. त्याने कधीही या रकमेवरून वाद घातला नाही. ५ कोटी रुपये प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटात गुंतवली होती आणि राजपालने ती कर्ज म्हणून घेतली नव्हती. “हे ५ कोटी रुपये तक्रारदाराने त्या चित्रपटात गुंतवले होते, राजपालच्या वैयक्तिक गरजांसाठी त्याला कर्ज दिलं नव्हतं,” असंही वकिलांनी स्पष्ट केलं.
राजपाल यादवला आर्थिक मदत करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक पुढे सरसावले आहेत. पण वकिलांनी त्यांची नावं जाहीर करण्यास नकार दिला. राजपाल स्वतः त्याबद्दल बोलेल, असं ते म्हणाले. “राजपाल खंबीर आहे. तो म्हणतोय की तो न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करेल. पण त्याची बाजू नीट ऐकली जावी एवढीच विनंती तो करतोय,” असं वकील म्हणाले.
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपालला जामीन मंजूर करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत १.५ कोटी रुपये जमा करण्याचा अल्टिमेटम दिला होता. जर दिलेल्या वेळेत रक्कम जमा केली नाही तर जामीनावरील सुनावणी आणखी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात येईल, असं न्यायालयाने म्हटलं होतं. पण दिलेल्या वेळेत त्याने पैसे जमा केल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पण अद्याप त्याची तुरुंगातून सुटका झालेली नाही.

