राजपाल यादवला चेक बाउन्स प्रकरणात १२ दिवस तुरुंगात राहावं लागलं. थकीत कर्जाची परतफेड न करू शकल्याने न्यायालयाने त्याला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी १६ फेब्रुवारीला न्यायालयाने त्याला जामीन दिला. सध्या राजपाल यादव तुरुंगाबाहेर असून काही सिनेमांचं शूटिंग पूर्ण करतोय. याचदरम्यान त्याने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राजपाल यादव तुरुंगात असताना नवाजुद्दीन सिद्दिकीचं एक जुनं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं, ज्यामध्ये त्याने संघर्षाच्या दिवसांत राजपालने मदत केल्याचं म्हटलं होतं. संघर्ष करत असताना आपण राजपाल यादवच्या घरी जेवायला जायचो, असं नवाजुद्दीन म्हणाला होता.

राजपाल यादवने मानले नवाजुद्दीन सिद्दिकीचे आभार

आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपालने नवाजुद्दीन सिद्दीकीचे आभार मानले आहेत. तसेच नवाजुद्दीनच्या या वक्तव्याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली. नवाजुद्दीन माझ्या घरी जेवला नव्हता, तर ते त्याचंच घर होतं, असं राजपाल यादवने म्हटलं.

यूपी तकशी बोलताना राजपाल म्हणाला, “त्याने माझ्या घरी जेवण केलं नाही. कारण ते त्याचंही घर होतं, अन्न देखील त्याचंच होतं, कारण त्याच्यामुळेच मला काम मिळालं होतं. तिथे वेगवेगळ्या राज्यातून आलेले १०-१५ अभिनेते होते, पण कोणाकडे काम आहे आणि कोणाला नाही याचा फरक पडत नव्हता. महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व एकत्र बसून रात्री जेवण करायचो, दररोज संध्याकाळी खूप हसायचो, गप्पा मारायचो. नवाजुद्दीनने मला श्रेय दिलं, हा त्याचा मोठेपणा आहे. पण त्यात माझं काहीच नव्हतं.”

राजपाल यादवने मानले सर्वांचे आभार

राजपाल यादवने दिलेल्या माहितीनुसार, त्याला त्याची पत्नी राधाने सांगितलं की अनेक लोकांनी तिच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आणि त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत राजपाल म्हणाला, ज्यांनी सोशल मीडियावर पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि जे सोशल मीडियावर आले नाहीत, आणि कधीही येणार नाहीत त्यांची यादी मोठी आहे. मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की बऱ्याच लोकांनी मदतीसाठी माझ्या फोनवर फोन केले होते. मी अजून माझा फोन नीट पाहिलेला नाही.

राजपाल यादव तुरुंगवास, जामीन व पुढील सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तो तिहार जेलमध्ये होता, पण आता त्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याला तक्रारदाराच्या खात्यात १.५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. ते पैसे राजपाल यादवने भरले. तसेच त्याला १ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड भरावा लागला. राजपाल यादवला त्याच्या पुतणीच्या लग्नासाठी जामीन दिला. पण त्याला देश सोडता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च २०२६ रोजी होणार आहे. पुढील सुनावणीला राजपाल यादव यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तोपर्यंत त्यांच्या ६ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. १८ मार्चच्या सुनावणीत थकीत रकमेची परतफेड आणि इतर कायदेशीर बाबींवर चर्चा होईल.