काही महिन्यांपूर्वी चेक बाऊन्स प्रकरणामुळे बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. तसेच काही दिवस तो तिहार तुरुंगात राहिला होता. पण राजपाल यादवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर येथील राजपालच्या दोन मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई’ने या लिलावाबाबत शहरातील आणि गावातील त्यांच्या या दोन्ही मालमत्तांवर नोटीस लावली आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
राजपाल यादवने ‘अता पता लापता’ हा चित्रपट बनवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. त्याने कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने गहाण ठेवलेली मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. राजपाल यादववर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईचे १६ कोटी ६१ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहेत. मात्र, या दोन मालमत्तांची किंमत ३ कोटी १९ लाख २६ हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
बँकेच्या नोंदीनुसार, शहाजहानपूरमध्ये राजपाल यादव यांच्या दोन मालमत्ता आहेत. त्यापैकी एक शहरात तर दुसरी गावात आहे. मालमत्तेत शेत आणि घराचा समावेश आहे. हा लिलाव ९ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे वृत्त आहे. कर्जासाठी राजपाल यादवने पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांची मालमत्ताही गॅरंटर म्हणून गहाण ठेवली होती, अशी माहितीही समोर आली आहे. याच आधारे बँकेने मालमत्तांवर कारवाई सुरू केली.
राजपाल यादववर ज्या कंपनीने चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला होता, त्याचे मालकही शहाजहानपूरचेच रहिवासी आहेत. शहाजहानपूरव्यतिरिक्त मुंबईतील राजपाल यादवच्या इतर काही मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रियाही सध्या सुरू असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. दरम्यान, लिलावाची नोटीस किंवा थकीत कर्जाबाबत राजपाल यादवकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
