Rajpal Yadav Recalls Misunderstanding With Shah Rukh Khan : राजपाल यादवने आपल्या करिअरची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. २००० मध्ये त्याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजपालने ‘बिल्लू’ चित्रपटातून आपल्याला काढून दिवंगत अभिनेते इरफान खान यांना घेतल्याची आठवण सांगितली. तसेच, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील एका भूमिकेवरून शाहरुख खानबरोबर झालेल्या एका गैरसमजाबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली.
‘टाइम्स नाऊ’शी बोलताना राजपालने खुलासा केला की, नकळत त्याच्याकडून शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’मधील भूमिकेला नकार दिला गेला होता. पुढे अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या ‘बिल्लू’ सिनेमाच्या सेटवर जेव्हा तो शाहरुखला भेटला, तेव्हा त्याने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते.
राजपाल म्हणाला, “जुही चावलाचे भाऊ बॉबी चावला तेव्हा निर्मितीचे काम पाहायचे. त्यांनी मला सांगितलं की, शाहरुखभाई तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू त्यांना भेट. मी त्यांना सांगितलं की, मी दुपारीच त्यांना भेटलो. त्यावर बॉबी म्हणाले की, काहीतरी गडबड झाली आहे. वेळ मिळत नसल्याच्या कारणावरून मी ‘ओम शांती ओम’मधील भूमिकेला नकार दिला आहे, असं शाहरुखभाईंना सांगण्यात आलं होतं आणि त्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. शाहरुखभाई यांना माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं गेलं. त्यांच्यासमोर माझी नकारात्मक प्रतिमा तयार केली गेली होती. आमच्यात मोठा गैरसमज झाला होता. मात्र, शाहरुखनं मनात काहीही न ठेवता मला मिठी मारली. तो एक उत्कृष्ट अभिनेता आणि एक उत्तम माणूस आहे.”
याच मुलाखतीत राजपालला एखाद्या भूमिकेला नकार दिल्याबद्दल पश्चात्ताप होतो का, असे विचारले, यावर अभिनेत्याने ‘बिल्लू’ चित्रपटाचा किस्सा सांगितला. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार होता; पण नंतर त्याच्याऐवजी इरफान खान यांची निवड झाली आणि राजपालला दुसरी भूमिका देण्यात आली. “मी ‘बिल्लू’मध्ये मुख्य भूमिका साकारणार होतो; पण नंतर माझी भूमिका बदलली गेली आणि इरफानभाईंनी ती भूमिका केली”, असे राजपालने सांगितले.
दरम्यान, आजवर अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला राजपाल त्याच्या आगामी नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. राजपाल यादव लवकरच प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटात दिसणार आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात राजपालसह अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, वामिका गब्बी व मिथिला पालकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
