Rajpal Yadav on upcoming work: अभिनेता राजपाल यादव हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. चेक बाउन्स प्रकरणात अभिनेत्याला आत्मसमर्पण करावे लागले होते. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेकजण त्याला मदत करण्यासाठी पुढे आले होते. सोनू सूद, सलमान खान आणि अजय देवगण यांच्यासह अनेकांनी अभिनेत्याला मदत केली होती. काही दिवसांपूर्वीच त्याला अंतरिम जामीन मिळाला आहे.

आता अभिनेत्याने केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. शनिवारी राजपाल यादवने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्याने भविष्यातील त्याच्या कामाबद्दल वक्तव्य केले.

या पत्रकार परिषदेला राजपाल यादव त्याच्या वकिलासह हजर होता. पत्रकार परिषदेत अभिनेत्याने सध्या सुरु असलेल्या केसबद्दल वक्तव्य केले. तसेच, भविष्य काळातील त्याच्या कामाबद्दल, गेल्या काही वर्षांपासून त्याला काय अनुभव आला, याबद्दल वक्तव्य केले.

“पुढील ७ वर्षांत माझ्याकडे १२०० कोटींचे…”

अभिनेत्याने या पत्रकार परिषदेत उघड केले की पुढच्या सात वर्षांत त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. ज्याचे एकूण मानधन जवळजवळ १००० कोटी इतके आहे. येत्या काही काळात दहा सिनमांमध्ये काम करणार असल्याचेदेखील राजपाल यादवने सांगितले.

अभिनेता म्हणाला, “पुढील ७ वर्षांत माझ्याकडे १२०० कोटींचे ब्रँडिंग प्रोजेक्ट्स आहेत. मी ४ करार केले आहेत. यामध्ये चित्रपटांचा समावेश नाही. यापैकी काही प्रोजेक्ट्स २०० कोटींचे आहेत, तर काहींची किंमत २००० कोटींपर्यंत आहे. या प्रकल्पांमधून मिळणारे उत्पन्न हे मानधन आणि प्रकल्पांतील भागीदारी अशा स्वरूपात आहे. तसेच माझ्याकडे १० चित्रपटांच्या ऑफर्सही आहेत.”

अभिनेता जेव्हा तुरुंगात होता, त्यावेळी त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. याबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला, “गेल्या २० दिवसांत मला अनेकांनी मदत केली. यामध्ये लहान मुलेदेखील आहेत. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे मला एक कोटी आणि त्याहून जास्त मदत केली आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी मी एक निवेदन जारी करणार आहे, तसेच ४-५ जणांचा विशेष उल्लेख करायचा आहे. जे आपले नाव जाहीर करू इच्छित नाहीत, त्यांचेही मी मनापासून आभार मानू इच्छितो.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मला दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल मी आभारी आहे. ज्यांनी माझ्यासाठी मदतीचा हात पुढे केला, त्यांनी त्यांचे बँकेचे डिटेल्स पाठवावेत, ही विनंती आहे. मला फक्त थोडा वेळ हवा आहे; मी सर्वांचे पैसे सन्मानपूर्वक परत करेन.”

अभिनेता लवकरच ‘भूत बंगला’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात वामिका गब्बी, तब्बू, परेश रावल, अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.तसेच अभिनेता वेलकम टू द जंगल या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.