राजपाल यादवने २०१२ मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं, त्यानंतर सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी त्याने म्हटलं होतं की, कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘चरित्र अभिनेत्यांच्या’ आर्थिक परिस्थितीबद्दल चर्चा सुरू झाली. इतके प्रतिभावान कलाकार असूनही त्यांना आर्थिक संघर्ष का करावा लागतो? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. राजपाल यादववर ही परिस्थिती ओढवल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक जण त्याच्या मदतीला धावले आणि त्याला कामाची ऑफर दिली. काहींनी तर आर्थिक मदतही केली.

जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने म्हटलं की त्याच्या तीन दशकांच्या करिअरमध्ये त्याच्याकडे काम नव्हतं असं कधीच घडलं नाही. तो कधीच कामाविना बसून राहिला नाही. फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये बोलताना त्याने पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला.

राजपाल यादवचा पहिला चित्रपट कोणता होता?

फराह खानने विचारलं, “तुझ्याकडे अजूनही काम आहे का?” राजपाल यादव म्हणाला, “मी तुझ्याबरोबर १९९९ मध्ये काम करून करिअरला सुरुवात केली होती.” फराहने “तो तुझा पहिला चित्रपट होता का?” असं विचारलं. “नाही, माझा पहिला चित्रपट ‘शूल’ होता, पण ‘शूल’ नंतर मी ‘मस्त’ मध्ये काम केलं. तो राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट होता,” असं राजपाल यादवने उत्तर दिलं. “म्हणजे तुला रामूने (राम गोपाल वर्मा) शोधलंय तर?” असं फराह खान म्हणाली. त्यावर राजपालने होकार दिला. मग फराह म्हणाली, “रामूने एक हिरा शोधलाय.”

Award Banner

राजपाल यादवला हृतिक व राकेश रोशनबरोबर मिळालेला पुरस्कार

राजपाल यादव म्हणाला, “रामूजींनी (राम गोपाल वर्मा) मला ‘जंगल’ चित्रपट दिला. त्या वर्षी ‘स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये हृतिक रोशनला ‘कहो ना… प्यार है’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, राकेश रोशन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर मला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला होता. करिअरच्या पहिल्याच वर्षी (२००० मध्ये) चित्रपटसृष्टीने मला इतके प्रेम आणि प्रसिद्धी दिली की, आतापर्यंत मी किमान २०० चित्रपट केले आहेत.” इंडस्ट्रीत काम मिळालं नाही, असं काही घडलं नसल्याचा आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी राजपाल यादवने हे विधान केलं.

प्रियदर्शनबरोरब राजपाल यादवने केले ५० चित्रपट

या आकड्यांवर प्रतिक्रिया देता फराह खान म्हणाली, “मला वाटतं तू किमान १०० चित्रपट तर फक्त प्रियदर्शन सरांबरोबरच केले असतील.” यावर ‘भागम भाग’, ‘मालामाल वीकली’ आणि ‘भूल भुलैया’ सारख्या चित्रपटांत काम करणारा राजपाल हसत म्हणाला, “खरं तर मी राम गोपाल वर्मा, प्रियदर्शन आणि डेव्हिड धवन या तिघांबरोबर प्रत्येकी किमान ५० चित्रपट केले आहेत.”

राजपाल यादव सलमान खान व अक्षय कुमारबद्दल म्हणाला…

फराह गंमतीने म्हणाली, “अगदी सलमान खानही तुझ्याविना काहीच करू नाही.” त्यावर राजपाल म्हणाला, “हो, सलमान भाई आणि अक्षय भाई दोघांचंही माझ्याशिवाय पान हलत नाही. मी शाहरुख खानबरोबरही चार चित्रपट केले आहेत.” मग फराह गमतीत म्हणाली, “हो, पण तू माझ्या एकाही चित्रपटात काम केलं नाहीयेस.” यावर राजपाल उत्तर देत म्हणाला, “खरं सांगायचं तर तुम्ही मला कधी संधीच दिली नाही. मला सांगा, या जगात असा कोण आहे ज्याला ‘मै हूं ना’ चित्रपटात काम करायचं नव्हतं?”

“पण त्या चित्रपटात मी तुला कोणती भूमिका दिली असती?” असा प्रतिप्रश्न फराहने विचारला. त्यावर बोलणं टाळत राजपाल पुढे म्हणाला, “‘ओम शांती ओम’ मध्ये काम करण्यासाठी कोण उत्सुक नव्हते?” फराहने हसत “हो, हे मात्र १०० टक्के खरं आहे,” असं म्हटलं.