Bollywood Actor Rajpal Yadav Surrenders at Tihar Jail: दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अभिनेता राजपाल यादव गुरूवारी तिहार तुरुंगामध्ये हजर झाला आहे. अभिनेत्याने आत्मसमर्पणाची अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. चेक बाऊन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे.

एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “राजपाल यादवने गुरूवारी दुपारी ४ वाजता तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.” अभिनेत्याच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की राजपाल यादवने ५० लाखांची व्यवस्था केली आहे आणि पैसे भरण्यासाठी आणखी एक आठवडा मुदत हवी आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने राजपाल यादवला तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्यासाठी दिलेली अंतिम मुदत वाढविण्यास नकार दिला.

अखेर राजपाल यादव तिहार कारागृहात हजर

२ फेब्रुवारी रोजी, अभिनेत्याला बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत शरण येण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरुद्ध अनेक चेक बाउन्स झाल्याबद्दल आणि त्यांचे पैसे परत न केल्याबद्दल केस दाखल केली आहे.

२०१८ मध्ये, दिल्लीतील दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवत अभिनेत्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली.

त्यानंतर राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. जून २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने अभिनेत्याला विरुद्ध पक्षाशी सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली. मात्र, अभिनेत्याने वारंवार दिलेल्या मुदतीचे पालन केले नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले.

या आधी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या होत्या की अभिनेत्याला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. सेटलमेंटची रक्कम भरण्याबाबत दिलेल्या सवलतीचे अभिनेत्याने वारंवार उल्लंघन केले. न्यायालयाने असेही सांगितले होते की सवलत देऊनही अभिनेत्याने पैसे भरले नाहीत.

राजपाल यादवच्या कामाबद्दल बोलायचे तर दिल क्या करे, शूल, प्यार तुने क्या किया, चांदनी बार, ये जिंदगी का सफर,एक और एक ग्यारह, मसीहा, वास्तू शास्त्र, हंगामा, पहेली, आग, पार्टनर, चल चला चल, तूफान, अंजान, पोलिसगिरी, वेलकम बॅक अशा अनेक चित्रपटातून अभिनेत्यान प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

याबरोबरच, बेबी जॉन, वनवास, नाम, लव की अरेंज मॅरेज या २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही अभिनेता महत्वाच्या भूमिकेत दिसला होता.