Rajpal Yadav Love Story : राजपाल यादव काही दिवसांपूर्वी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. पण, चेक बाउन्स प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर आता ते त्यांच्या खासगी आयुष्यात पुन्हा हळूहळू रुळत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कामालाही सुरुवात केल्याचं म्हटलं जातंय.

राजपाल यादव बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विनोदी भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशातच आता काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी सहपत्नीक ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. दोघांच्या लग्नाला आधी विरोध झाल्याचं त्यांनी यामधून स्पष्ट केलं आहे. राजपाल यादव यांचं हे दुसरं लग्न आहे.

‘अशी’ आहे राजपाल यादव यांची प्रेमकहाणी

मुलाखतीत राजपाल यादवच्या पत्नी म्हणाल्या, “मी कॅनडामध्ये राहायचे. तो त्याच्या हीरो चित्रपटासाठी शूटिंग करत होता. आम्ही एका मित्रामुळे भेटलो. आमची मैत्री झाली आणि तो माझ्या घरीसुद्धा आलेला आणि माझ्या पालकांनाही भेटला होता. त्यावेळी आमचं लग्न होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. लग्नापूर्वी आम्ही १० महिने लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. २००३ मध्ये मी भारतात आले आणि आम्ही लग्न केलं.”

Award Banner

राजपाल यादव यांच्या पत्नी राधा यांनी त्यांच्या आई-वडिलांनी राजपाल यादव यांच्याबरोबरच्या लग्नाला विरोध केल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “आमच्यामध्ये १३.५ वर्षांचं अंतर असल्यानं माझ्या आई-वडिलांनी लग्नाला सहजासहजी होकार दिला नव्हता. आता आमच्या लग्नाला २३ वर्षं झाली आहेत.”

लग्नानंतर राजपाल यांच्या पत्नीनं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. कारण- लग्न झालं तेव्हा त्या लहान होत्या. राजपाल याबद्दल म्हणाले, “लग्नानंतर मी तिला तिचं शिक्षण पूर्ण करायला सांगितलं.” राधासुद्धा याबद्दल तेच म्हणाल्या. त्यांनी सांगितलं, “मी १८ व्या वर्षी त्याच्याशी लग्न केलं आणि तेव्हा मी त्याला सांगितलेलं की, मला माझी डिग्री पूर्ण करायची आहे आणि मला पुढे शिकायचं आहे. मला इंटेरियर डिझायनिंगमध्ये आवड होती. मी लग्नानंतर एक वर्ष लंडनमध्ये आणि एक वर्ष दुबईत त्याचं शिक्षण घेतलं.”

राजपाल यादवनं पुढे लग्न झाल्यापासून राधा जी कपडे त्याच्यासाठी खरेदी करतात. तेच कपडे तो परिधान करतो, असं म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, “गेली २३ वर्षं मी राधानं आणलेले कपडेच घालत आहे.” पुढे लग्नानंतर कॅनडा येथे खरेदीसाठी गेलेले असताना राजपाल यांना त्यांच्या मापाचे कपडे सापडत नव्हते. तेव्हा राधा यांनी लहान मुलांच्या सेक्शनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी कपडे खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं.