Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलीवूडचा अभिनेता राजपाल यादव एका आर्थिक संकटात सापडला आहे. २५ लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणात त्यानं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. राजपालनं एका चित्रपटासाठी कर्ज घेतलं होतं आणि तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर घेतलेलं कर्ज फेडण्यात तो अपयशी ठरला होता. याच प्रकरणी आता त्यानं तुरुंगात आत्मसमर्पण केलं. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला इंडस्ट्रीतून मदत केली जात आहे.
राजपालचा मॅनेजर गोल्डीनं याप्रकरणी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडमधील काही कलाकारांनी अभिनेत्याला आर्थिक मदत केली असल्याचं सांगितलं. त्यात अजय देवगण, सलमान खान, वरुण धवन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यानं अभिनेत्याच्या जामिनाबाबतही प्रतिक्रिया दिली.
सलमान खान-अजय देवगनकडून मदत
‘स्क्रीन’शी बोलताना गोल्डी म्हणाला, “राजपाल यादवला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. सोनू सूद, सलमान खान व अजय देवगण यांनी मदत केली आहे. नुकतीच माझी डेव्हिड धवन यांच्याशीही चर्चा झाली. रतन नैन, वरुण धवन यांच्यासह अनेक जण मदत करत आहेत. राजपालने या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.”
राजपालनं आत्मसमर्पण करण्यापूर्वी कोणाकडे मदत मागितली होती का, असा प्रश्न विचारला असता, गोल्डीनं त्यावर उत्तर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, “याबाबत मी काही बोलू इच्छित नाही; पण या कठीण काळात इंडस्ट्री राजपालच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, ही कौतुकास्पद आहे. सर्वांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे; मात्र असे आर्थिक व्यवहार होण्यासाठी वेळ लागतो.”
राजपाल यादव उद्या जामीनावर सुटेल?
पुढे मॅनेजरने आशा व्यक्त केली की, राजपाल लवकरच जामिनावर सुटू शकतो. तो म्हणाला, “या काळात राजपाल स्वतः खूप खंबीर राहिला आणि त्याचं कुटुंबसुद्धा खंबीर आहे. येत्या काही दिवसांत कौटुंबिक समारंभ नियोजित आहेत. त्याआधी राजपाल बाहेर यावा, अशी सर्वांची इच्छा आहे. आशा आहे की, तो उद्यापर्यंत जामिनावर सुटेल. उद्या त्याच्या जामिनाबद्दलची सुनावणी आहे. आम्हाला विश्वास आहे की, त्याचा जामीन मंजूर होईल.”
राजपालच्या मदतीसाठी कलाकारांचा पुढाकार
यापूर्वी सोनू सूद, गुरू रंधावा, गुरमित चौधरी, केआरके, तसेच संगीत दिग्दर्शक राव इंद्रजित यादव यांनी राजपालसाठी मदतीची घोषणा केली होती. त्यात आता सलमान खान, अजय देवगण, धवन कुटुंबीय व तेजप्रताप यादव यांच्या नावांचाही समावेश झाला आहे.

