Nawazuddin Siddiqui on Rajpal Yadav: चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवने काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. यावेळी माझ्याकडे सध्या पैसे नाही, आत्मसमर्पण करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे अभिनेत्याने म्हटले होते.

राजपाल यादव आर्थिक अडचणींचा सामना करत असून, काही दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणामुळे तो चर्चेत आहे. दिलेल्या मुदतीचे वारंवार उल्लंघन केल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

अभिनेत्याने आत्मसमर्पण केल्यानंतर सोनू सूदने एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत राजपाल यादव त्याच्या चित्रपटात काम करेल, तसेच प्रत्येकाने भविष्यातील त्याच्या प्रोजेक्टची सायनिंग अमाउंट दिली पाहिजे, असेही मत व्यक्त केले. या परिस्थितीत राजपाल यादव एकटा नाही, हे आपण इंडस्ट्री म्हणून दाखवून दिले पाहिजे, असेही सोनू सूद म्हणाला होता. सोनू सूदने मदतीचा हात पुढे केल्यानंतर इंटस्ट्रीतील काही निर्माते, कलाकारांनीदेखील सोनूच्या पावलावर पाऊल ठेवत राजपाल यादवला आर्थिक मदत केली आहे.

Award Banner

म्युझिक कंपोजर राव इंद्रजित यादव यांनीदेखील राजपाल यादवला आर्थिक मदत जाहीर केली. त्यांनी राजपाल यादवच्या कुटुंबाला १.११ कोटीची मदत करणार असल्याचे सांगितले. त्यांनी याबद्दल माहिती देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “सोशल मीडियाच्या माध्यमातून मला राजपाल यादव आर्थिक संकटात असल्याचे समजले. मला फार वाईट वाटले.”

पुढे त्यांनी लिहिले, “राजपाल यादव फक्त चांगले कलाकारच नाहीत, तर एक उत्तम अभिनेतेदेखील आहेत. अशा कठीण काळात अभिनेत्याच्या कुटुंबाबरोबर आपण उभे राहणं हे माणुसकीच्या नात्यानं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मी जेम ट्युन्स फॅमिलीकडून राजपाल यादवला १,११,००,००० इतकी मदत करत आहे.” तसेच, पुढे त्यांनी सर्वांना अभिनेत्याला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच अभिनेत्याचे बँकेचे तपशीलदेखील शेअर केले आहेत.

“तो संवेदनशील व्यक्ती…”

तेज प्रताप यादव यांनी ११ लाखांची मदत केली. तर, सोनू सूदची पोस्ट पाहून गायक गुरू रंधावानेदेखील त्याच्या आगामी प्रोजेक्टची सायनिंग अमाउंट राजपाल यादवला आधीच दिली आहे. तसेच, सोनू सूदला उद्देशून लिहिले की, तुम्ही ज्याची सुरुवात केली होती, मी तेच करत आहे. आपण सगळ्यांनी राजपाल यादव यांना मदत करून घरी आणूया.

आता या सगळ्यात नवाजुद्दीन सिद्दिकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत राजपाल यादवबद्दल त्याचे मत व्यक्त केले होते. तो म्हणालेला, “जेव्हा राजपालला काम मिळायला लागले, तेव्हा तो अनेकांना जेवण देत होता. जेव्हा आम्ही इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत होतो, त्यावेळी त्याने आम्हाला मदत केली, आम्हाला पाठिंबा दिला होता. तो एकदाही मदत करण्यापासून मागे हटला नाही. त्याने अनेक संघर्ष करणाऱ्या कलाकारांना मदत केली आहे. त्याच्या घरात जाऊन कोणीही जेवू शकत होते. त्याच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असायचे. तो संवेदनशील व्यक्ती आहे.”

राजपाल यादवने २०१० मध्ये मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटींचे कर्ज घेतले होते. आता पता लापता या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. मात्र, हा चित्रपट अपयशी ठरला आणि त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले. त्यानंतर तो कर्ज फेडू शकला नाही.

या प्रकरणात मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरुद्ध अनेक चेक बाउन्स झाल्याबद्दल आणि त्यांचे पैसे परत न केल्याबद्दल केस दाखल केली. २०१८ मध्ये दिल्लीतील दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवत अभिनेत्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना आव्हान दिले. त्यानंतर शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली; मात्र अभिनेत्याने वारंवार दिलेल्या मुदतीचे पालन केले नाही.

आत्मसमर्पण करताना अभिनेता म्हणाला होता की, मी काय करू शकतो? माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्याकडे पर्याय नाही. सर, इथे आपण सगळे एकटे आहोत.

दरम्यान, आता राजपाल यादवच्या केसमध्ये पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.