Rajshri Deshpande : ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजमुळे मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे घराघरांत पोहोचली. आजवर तिने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक आयुष्यात राजश्री खूपच कठीण प्रसंगाचा सामना करतेय. मार्च महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजश्रीने तिला कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती सर्वांना दिली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजश्री देशपांडे याबद्दल NDTV शी संवाद साधताना म्हणाली, “आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक निगेटिव्हिटीचा मी तितक्याच सकारात्मकतेने सामना करते. हेच आपलं आयुष्य आहे आणि इथे सर्वांनाच स्वत:साठी लढणं भाग आहे. लोक कॅन्सरकडे गंभीर किंवा मोठा आजार म्हणून पाहतात. पण, हा आजार तुम्हाला एक वेगळी दिशा दाखवतो. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो…आपण जगतोय ते आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते. तुम्हाला रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची किती गरज आहे, याची जाणीव आपल्याला होते.”
कॅन्सरवर उपचार सुरू करणं हा रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काळ असतो. राजश्री याबाबत पुढे सांगते, “बालपणी मला भुतांची भीती वाटायची. त्यावेळी माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की, आयुष्यात येणारी वाईट माणसं ही भूतच असतात. त्यानंतर मग माझा भुतांबद्दलचा समज बदलून गेला. आता त्याचप्रमाणे मी विचार करते, कॅन्सर हा आजार वाईट माणसांप्रमाणे आहे…या आजाराला तुमच्या मनातून, हृदयातून, शरीरातून सगळीकडून दूर करा. सकारात्मक विचार करणाऱ्या माणसांच्या सानिध्यात राहा…मला हे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की, तुमच्या शरीरातील हार्मोन्स आनंदी असायला हवेत. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक माणसं असावीत. निरोगी जीवनशैली जगण्याला प्राधान्य द्या.”
कर्करोगाबाबत केव्हा समजलं? आई-बाबांपासून महिनाभर लपवलं…
राजश्री देशपांडेला ‘इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा’ म्हणजेच ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. सुदैवाने सुरुवातीच्या टप्प्यातच तिला या आजाराबद्दल समजलं. रुटिन चेकअपसाठी गेल्यावर राजश्रीला कर्करोगाबद्दल समजलं होतं. टेस्ट केल्यावर डॉक्टरांना गाठ आढळली होती आणि ही गाठ कोणती आहे हे तपासणं गरजेचं होतं. कर्करोगाचं निदान झाल्यावर अभिनेत्रीने महिनाभर घरी काहीच सांगितलं नव्हतं. सर्जरी झाल्यावर राजश्रीने याबाबत आईला सांगितलं पण, याकाळात मित्र परिवाराने मोठी साथ दिली असंही अभिनेत्रीने नमूद केलं.
राजश्री काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत म्हणाली होती, “कॅन्सरचं निदान झाल्यावर अनेक चाचण्या केल्या, शस्त्रक्रिया झाली…हा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर राईडसारखा होता. पण, तुम्हा सर्वांचं प्रेम कायम माझ्याबरोबर होतं आणि म्हणूनच मी या कठीण प्रसंगाचा सामना मोठ्या धीराने करू शकले. शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई आणि बाबांचे चेहरे पाहून माझ्या मनातली भीती नाहीशी झाली आणि मला जगण्याची नवी उमेद मिळाली.”
दरम्यान, राजश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती आता ‘बाप्या’ सिनेमात झळकणार आहे. येत्या १५ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. यामध्ये तिच्यासह अभिनेते गिरीश कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
