Rajshri Deshpande Cancer News: ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘ट्रायल बाय फायर’ सारख्या गाजलेल्या वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. राजश्रीला ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झाल्याचे निदान झाले असून तिने सोशल मीडियावर रुग्णालयातील काही फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. “जेव्हा मला पहिल्यांदा कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा मी रुग्णालयात एकटीच होते आणि पूर्णपणे खचून गेले होते,” अशा शब्दांत तिने आपला तो भीषण अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
राजश्री देशपांडेला काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं. राजश्रीवर सध्या उपचार सुरू आहेत. तिने कॅन्सरबद्दल पोस्ट केल्यानंतर अनेक कलाकारांनी व तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिची रुग्णालयात भेट घेतली. श्रिया पिळगांकवर, छाया कदमसह अनेक जण तिच्या भेटीला गेले होते. राजश्रीने रुग्णालयातील फोटो शेअर करत एक हृदयस्पर्शी पोस्ट केली आहे.
रिपोर्ट सेंटरबाहेर मी एकटीच होते- राजश्री देशपांडे
“मला अजुनही आठवतंय, जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या ‘ब्रेस्ट कॅन्सर’बद्दल समजलं, तेव्हा रुग्णालयातील रिपोर्ट सेंटरबाहेर मी एकटीच होते आणि पूर्णपणे खचून गेले होते. नाही, मी त्यावेळी स्वतःला सावरू शकले नाही. माझ्यात अजिबात ताकद उरली नव्हती. आज जेव्हा लोक मला विचारतात की, ‘हे तुला कसं काय झालं? तू तर इतकी फिट आहेस…’, तेव्हा खरं सांगू तर माझ्याकडे याचं कोणतंही उत्तर नसतं,” असं राजश्रीने लिहिलं.
असह्य वेदना, अनेकदा रडली राजश्री देशपांडे
पुढे ती म्हणाली, “हा त्रास फक्त शारीरिक नव्हता, तर मानसिक आणि भावनिक होता. या वेदना असह्य होत होत्या. मी अनेकदा रडले, कधी एकटी असताना, तर कधी माझ्या मित्रांबरोबर असताना. या मित्रांनी प्रत्येक पावलावर मला आधार दिला. पण असेही अनेक दिवस होते जेव्हा मी पुन्हा निश्चय केला, ताकदीने उभी राहिले आणि मी हार मानणार नाही असं ठरवलं.”
या प्रवासात साथ देणाऱ्यांबद्दल राजश्री म्हणाली…
“कधी कधी असे दिवस येतात जेव्हा मला जगातील सगळी शक्ती नको असते. मला फक्त शांत राहायचे असतं. मेरी ऑलिव्हरच्या कवितेसारखं किंवा माझ्या खिडकीतील बोगनवेलीवर बसून माझ्याबरोबर सूर्योदय पाहणाऱ्या चिमण्यांसारखं. सकाळी आनंदाने आणि हसतमुखाने उठणं याला मी अचिव्हमेंट म्हणू शकते का? मग मी आज ते मिळवलंय. आज मी स्वतःसाठी एक हास्य आणि स्वतःचीच एक मिठी मिळवली आहे. या प्रवासात जे लोक माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी मला फोन, मेसेज करून इतकं प्रेम दिलं, त्या सर्वांचे मी आभार मानते. मला माहित आहे की उद्या पुन्हा नवीन संघर्षासाठी तयार राहावं लागेल, पण आजचा दिवस फक्त प्रेमाचा असू दे. प्लीज,” असं राजश्री देशपांडे म्हणाली.
कमेंट्समध्ये प्रेमाचा वर्षाव
राजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभय देओल, कोंकणा सेन शर्मा यांनी ‘तुला खूप खूप प्रेम’, अशा कमेंट्स केल्या आहेत. मिथिला पालकरने ‘हग्स अँड हग्स’ अशी कमेंट केली आहे. तर सारंग साठ्ये, तिलोत्तमा शोम, अश्विनी अय्यर तिवारी, कुब्रा सैत यांनीही या पोस्टवर कमेंट्स करून राजश्रीला धीर दिला आहे.
