This Veteran Actor Took Exit From Spirit : दिवसाला फक्त आठ तास काम करणार, अशी मागणी ठेवणाऱ्या दीपिका पादुकोण व ‘स्पिरीट’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदी रेड्डी वांगा यांच्यामध्ये यावरून मतभेद झाल्याने अभिनेत्रीची चित्रपटातून एक्झिट झाली, असं म्हटलं जातं. दीपिका यामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेतून झळकणार होती. अशातच आता याच चित्रपटातून अजून एका अभिनेत्याची एक्झिट झाल्याचं म्हटलं जात आहे.
दीपिकाच्या एक्झिटनंतर चित्रपटात तृप्ती डिमरीची एन्ट्री झाली. तर सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ चित्रपटाचं हैदराबादमध्ये शूटिंग सुरू आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असून, त्यामध्ये मोठमोठे कलाकार आहेत. ‘ओटीटी प्ले’च्या वृत्तानुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होते. परंतु, आता त्यांना या चित्रपटातून वगळण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होते आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही झालेली. विशेषकरून जेव्हा चित्रपटाच्या लाँच व्हिडीओला त्यांचा आवाज देण्यात आलेला. त्यामुळेच त्यांची भूमिका किती महत्त्वाची असेल याची कल्पना केली जात होती.
अशातच आता चित्रपटाच्या सेटवर काही अनपेक्षित गोष्टी घडल्या असून, प्रकाश राज व संदीप रेड्डी वांगा यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं असल्याचं म्हटलं जात आहे. एका सीनच्या स्क्रिप्टवरून हे झाल्याची चर्चा आहे. चित्रीकरणादरम्यान प्रॉडक्शन टीमबरोबरही समस्या उदभवल्याचंही म्हटलं जातंय. अद्याप संदीप रेड्डी वांगा किंवा प्रकाश राज यांनी याबद्दल कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
संदीप रेड्डी वांगा यांच्यापूर्वी प्रकाश राज यांचे इतरही काही चित्रपट निर्मात्यांबरोबर सर्जनशीलतेवरून मतभेद झाल्याचं म्हटलं जातं. परंतु, यावेळीसुद्धा तेच कारण आहे की दुसरं काही याबद्दल अद्याप अधिकृती माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रभासची मुख्य भूमिका असलेला आणि संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरीट’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ५ मार्च २०२७ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
