Rakesh Bedi : धुरंधर या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, कॅमेराचं टेकिंग, उत्तम संवाद, उत्तम अभिनय, जुन्या गाण्यांना दिलेला नवा टच या सगळ्या गोष्टी धुरंधरच्या जमेच्या बाजू आहेतच, त्यात काही शंकाच नाही. या चित्रपटातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कलाकारांचा अभिनय. रणवीर सिंग, आर.माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना, गौरव गेरा, सारा अर्जुन या कलाकारांनी उत्तम काम केलंय. मात्र या चित्रपटातला खरा धुरंधर ठरलेला एक माणूस आहे ज्याच्याशिवाय संपूर्ण चित्रपट अधुरा आहे. तो माणूस म्हणजे राकेश बेदी.

धुरंधर मधली राकेश बेदींची भूमिका कैक वर्षे स्मरणांत राहिल यात शंकाच नाही

राकेश बेदी सध्या ७१ वर्षांचे आहेत. त्यांच्या अभिनयाची झलक आपण आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये पाहिली आहे. पण ‘धुरंधर’ हा त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरलाय यात शंकाच नाही. जमील जमाली हे पात्र राकेश बेदींनी ज्या खुबीने साकारलं आहे त्याला तोड नाही. जमील जमाली हे काल्पनिक पात्र आहे ते पाकिस्तानचे आमदार नबील गबोल यांच्यावर आधारित आहे अशाही चर्चा झाल्या. पण राकेश बेदी आणि नबील गबोल यांच्या दिसण्यातलं साम्य सोडलं तर बाकी तथ्य यात काही नाही. एक कलाकार आपल्या भूमिकेत अभिनयाचे किती पैलू दाखवू शकतो आणि आपल्या पात्राचा आलेख कसा उंचावू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राकेश बेदींचा जमील जमाली. पाकिस्तानातल्या स्वार्थी, सत्तापिपासू आणि कोल्ह्यासारखं लबाड राजकारण करणाऱ्या नेत्यांची प्रतिमा, त्यांच्या विविध शेड्स राकेश बेदींनी अत्यंत खुबीने सादर केल्या आहेत. त्यामुळेच धुरंधरची खासियत ही आहे की धुरंधर जेवढा आदित्य धर, रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, माधवन, संजय दत्त यांच्यासाठी ओळखला जाईल त्यापेक्षा कैक पटीने अधिक तो राकेश बेदींसाठी ओळखला जाईल. धुरंधरमधला जमील जमाली काय ? ते राकेश बेदींनी त्यांच्याच ओळींमध्ये सांगितलंय.

शोर नदी का नहीं, आबशार का है..
यहाँ से जो भी सफर है उतार का है..
अगर कोई तुमसे ये कहे ए बच्चा है तू मेरा
उससे बचके रहो वो आदमी बेकार का है..
जो काम हुआ है, वो हमनें ही किया है
जो नहीं हुआ, पिछली सरकार का है
अरे ये तो मान गया, की ये पूल अब ना गिरेगा
बेचारा मारा हुआ किसी अखबार का है

राकेश बेदी

धुरंधरच्या जमीलच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हते राकेश बेदी

राकेश बेदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की धुरंधरच्या या भूमिकेसाठी म्हणजेच जमील जमालीसाठी ते स्वतः पहिली पसंती नव्हते. अनेकांनी आदित्य धरला हे सांगितलं होतं की राकेश बेदींना घेऊ नकोस हे पात्र कॉमेडी वाटेल. तू कुठल्या तरी मोठ्या स्टारला या भूमिकेसाठी विचारणा कर. पण आदित्य धर ठाम होता तो म्हणाला जमील जमाली हे पात्र करतील तर राकेश बेदीच. त्यामुळे ही संधी राकेश बेदींना मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करुन दाखवलं. दिग्दर्शकाला जे हवंय त्यापेक्षा जास्त काहीतरी दिलं तर तो आपल्याला लक्षात ठेवतो हे राकेश बेदींनी म्हटलंय. शिवाय यासाठी त्यांनी धुरंधरमधल्या रहमान डकैतच्या मुलाला मारलं जातं त्या प्रसंगाचा संदर्भही दिला. ते म्हणाले एखाद्या कुख्यात गुंडाचा मुलगा मेला आहे. अशावेळी तिथे ओरडत जाणं हे दिग्दर्शकाला म्हणजेच आदित्यला पसंत नव्हतं. पण मी त्याला हे सांगितलं की जर मी अशा पद्धतीने गेलो तरच लोकांना कळेल की हा लबाड आणि खोटारडा आहे. ‘मुझे जैसे ही खबर मिली मै नंगे पाव दौडता हुआ अस्पताल आ गया..’ असं जमील जमाली म्हणतात. कट टू कारमध्ये बसताना ते मोजडी घालताना दाखवलेत. पात्राचा खोटेपणा, लबाडी सगळं एका प्रसंगात त्यांनी दाखवलं आहे. शिवाय इथून पुढेही हा जमील जमाली असाच वागणार आहे याची खात्रीही पटवून दिली आहे.

Rakesh Bedi
राकेश बेदी यांनी जमील जमाली यांच्या भूमिकेत खरोखर कमाल केली आहे यात शंकाच नाही. (इंडियन एक्स्प्रेस)

संवादफेक आणि डोळ्यांमधले हाव-भाव

जमील जमालीच्या भूमिकेत जो वावर राकेश बेदींनी केलाय त्याला खरोखर तोड नाही. ‘बच्चा है तू मेरा’ म्हणत शत्रूला आपलंसं करण्याची स्टाईल. बच्चा है तू मेराच्या विविध शेड्स आणि त्यानंतर आपलं अंतरंग वेगळं दाखवणं, बच्चा है तू मेरा आ तुझे फँटा पिला दूं म्हणत रहमान डकैत डोईजड होऊ नये म्हणून त्याला ‘सेट’ करण्याचा प्रयत्न. हमजा अली मजारीकडे (रणवीर सिंग) पहिल्यांदा ज्या नजरेनं जमील जमाली पाहतो ती नजर ते शेवटी क्लायमॅक्सच्या सीनमध्ये जेव्हा हमजा त्यांना सांगतो की एक बात का अफसोस रहेगा मै दाऊद को नहीं मार पाया त्यानंतर कुत्सितपणे हसत दाखवलेला तो व्हिडीओ आणि हमजाकडे पाहणं या संपूर्ण भूमिकेचा आलेख ज्या पद्धतीने राकेश बेदींनी उंचावत नेलाय त्याला खरोखर जवाबच नाही. राकेश बेदींनी अभिनय करावा आणि तो पाहात रहावा अशा पद्धतीने राकेश बेदी खिळवून ठेवतात.

बच्चा है तू मेरा, हा संवाद आदित्य धरने लिहिला होता. मी जेव्हा तो वाचला, त्याचा सराव केला तेव्हा मला समजलं की या ओळीला वेगवेगळे स्तर आहेत, पदर आहेत. ही अशी ओळ आहे जी थेट हे सांगते आहे की जो माणूस तुम्हाला हे म्हणतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे बच्चा है तू मेरा ही ओळ मी वेगळ्या पद्धतीने चित्रपटात म्हटलीये.

राकेश बेदी

उरीचा एक सीन आणि धुरंधर मिळाला

‘उरी’ या चित्रपटात राकेश बेदींनी एकच सीन केलाय. पण तो देखील इतका प्रभावी केलाय की त्यामुळेच त्यांना धुरंधर चित्रपटातला इतका महत्त्वाचा आणि बहुआयामी रोल मिळाला आहे. धुरंधर चित्रपटात रहमान डकैत जेव्हा हे सांगतो की त्याला वेगळा पक्ष काढायचा आहे, त्यावेळी त्यांचे हावभाव आणि दुसऱ्या क्षणी ‘सयाना हो गया मेरा बच्चा, चल आजा तुझे फँटा पिला दूँ’ हे ज्या लकबीने म्हटलंय ते राकेश बेदी सोडून इतर कुणाला जमलं असतं असं मुळीच वाटत नाही.

Rakesh Bedi News
राकेश बेदी यांनी चेहऱ्याचे हावभाव आणि संवाद या जोरावर भूमिका खूप सुंदर पणे साकराली आहे.

धुरंधरचा ट्विस्ट सीन आणि राकेश बेदींची कमाल

धुरंधर आणि धुरंधर द रिव्हेंज या दोन्ही चित्रपटांमध्ये राकेश बेदींचा वावर हा एखाद्या धूर्त कोल्ह्यासारखा दाखवला आहे. या भूमिकेला त्यांनी अगदी व्यवस्थित न्याय दिलाय यात शंकाच नाही. मात्र पाकिस्तानची जवळपास राखरांगोळी करुन जेव्हा हमजा भारतात परतत असतो तेव्हा त्याला सरप्राईज मिळतं ते जमील जमालींच्या रुपाने. अखेरच्या सीनमधला तो ट्विस्ट आणि जमील जमालींच्या भूमिकेत राकेश बेदींनी केलेली कामगिरी यातला त्यांचा वावर केवळ अप्रतिम. शिवाय जो इतक्या माणसांचा खात्मा करुन आलाय त्याला जमील जमाली म्हणतो, जिंदा रखकर तडपाने जो मजा है, वो मारने में कहां! त्यामुळे तिथेच स्पष्ट होतं की खरा धुरंधर जमील जमालीच आहेत. धक्कातंत्राचा वापर करुन हा प्रसंग आदित्य धरने चित्रपटात आणलाय. ज्याला राकेश बेदींनी योग्य न्याय दिलाय. त्यामुळे राकेश बेदी म्हणजे चित्रपटातलाच नाही तर अभिनयातलाही धुरंधर माणूस आहे हे त्यांनी दाखवून दिलंय.