Rakesh Bedi Talks About Pakistani Politician Nabeel Gabol : ‘धुरंधर २’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. आदित्य धर लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातील इतर पात्रसुद्धा लोकप्रिय ठरत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेते राकेश बेदी यांनी साकारलेली जमील जमेली हे पात्र.

राकेश बेदी ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यामधील त्यांनी साकारलेलं जमील जमेली हे पात्र खूप लोकप्रिय ठरलं. चित्रपटातील त्यांचे संवाद आणि विनोदी सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रेक्षकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. यासह पाकिस्तानमधील राजकारणी नबील गबोल यांनीसुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक केलं. परंतु, त्यांनी राकेश बेदी यांचं ‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’मधील जमील जमेली हे पात्र त्यांच्यावरच आधारित असल्याचा दावा केला होता. आता राकेश बेदी यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राकेश काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

नबील गबोल काय म्हणालेले?

माध्यमांच्या वृत्तानुसार नबील गबोल यांनी एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी चित्रपटात साकारलेलं जमील जमेली हे पात्र त्यांच्यावरच आधारित असून ते खरं आयुष्यात अधिक दबंग आहेत तसेच या चित्रपटात ल्यारीला दहशतवाद्यांचं ठिकाण असं दाखवलं आहे ते ‘धुरंधर ३’ असा एक वेगळा चित्रपट बनवणार अर्थात त्याचं नाव वेगळं ठेवणार आणि त्यातून ल्यारीबद्दलचं सत्य सर्वांना सांगणार असंही म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी अजून एक मुलाखत दिली ज्यामध्ये ते राकेश बेदी यांचं कौतुक करताना दिसले. राकेश बेदी यांच्याबद्दल ते म्हणालेले, “राकेश बेदी एक ज्येष्ठ कलाकार आहेत आणि मी त्यांचा आदर करतो त्यांना माझा हा निरोप द्या आय लव यू राकेश बेदी.”

Award Banner

राकेश बेदी यांची प्रतिक्रिया

राकेश बेदी यांनी आता ‘लल्लन टॉप’ला दिलेल्या मुलाखतीत नबील गबोल यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “मला हे सांगायला आवडेल की, आय लव्ह यू नबील गबोल! मी थोडासा तुमच्यासारखा दिसतो, हा केवळ एक योगायोग आहे. त्यात मी काहीही करू शकत नाही. ना तुमचे वडील भारतात आले होते, ना माझे वडील पाकिस्तानामध्ये गेले होते. केवळ शरीरयष्टीमुळे आपण एकमेकांसारखे दिसतो.”

राकेश बेदी यांनी स्पष्ट केलं की, त्यांचं जमील जमेली हे पात्र कोणा एका व्यक्तीवर आधारित नसून ते पाकिस्तानमधील अनेक राजकारण्यांचं प्रतिनिधित्व करणारे एक काल्पनिक पात्र आहे, जे आदित्य धरने लिहिलं आहे.