Rakhee Gulzar on Aamir Khan Third Marriage: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अभिनेता तिसरे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर एका मुलाखतीत आमिर खानने या चर्चा खऱ्या असल्याचे म्हटले. त्याबरोबरच त्याने लग्नाची तारीखही सांगितली. ५ जुलैला तो बोहल्यावर चढणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबर तो लग्न करणार आहे. आमिरचे हे तिसरे लग्न आहे. याआधी त्याची दोन लग्न झाली आहेत.

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ताबरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुले आहेत. त्यांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने बॉलीवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका व निर्माती किरण रावबरोबर लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता गौरीबरोबरचे त्याचे हे तिसरे लग्न आहे.

गेल्या वर्षी आमिर खानने ६० व्या वाढदिवसाला त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करून दिली होती. गौरी मूळची बेंगळुरूची आहे. त्याआधी दीड वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. आता अभिनेत्री राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे.

राखी गुलजार आमिर खानबद्दल म्हणाल्या…

ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनी ‘व्हरायटी इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आमिर खानबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “सध्या मी चित्रपटसृष्टीत काय घडत आहे, तेथील बातम्यांमध्ये जास्त लक्ष घालत नाही. तसेच, मी आमिर खानबरोबर कामही केलं नाही; पण तो खूप प्रामाणिक व्यक्ती आहे. त्यानं रीना दत्ता, किरण राव यांच्याशी घटस्फोटानंतरसुद्धा मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत, त्याची ही गोष्ट मला खूप आवडते.”

आमिर खान ६० व्या वर्षी तिसरे लग्न करीत आहे. त्याबद्दल त्या म्हणाल्या, “वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यास काय हरकत आहे? रॉबर्ट डी नीरो (अमेरिकन अभिनेते) यांनीही दोनदा लग्न केले आहे आणि आता ते एका नात्यात आहेत. २०२३ मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे वय ८० हून अधिक होते. लग्नात आनंद हा वयावर अवलंबून नसतो; तर समजूतदारपणा आणि साथ यावर असतो. ” त्या स्वत:चे उदाहरण देत म्हणाल्या की, गीतकार व फिल्म निर्माते गुलजार यांच्याशी लग्न केले, त्यावेळी त्यांचे वय ४० होते.

आमिर खान नेमकं काय म्हणाला होता?

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणालेला की, मी सध्या अमेरिकेत आहे. माझ्या लग्नाच्या ज्या चर्चा आहेत, त्या खऱ्या आहेत. ५ जुलै रोजी लग्न होणार आहे.

दरम्यान, त्याच्या लग्नात बॉलीवूडमधील कोणकोणते कलाकार हजेरी लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.