Rakhi Sawant on Govinda: राखी सावंतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच, तिच्या अनेक वक्तव्यांची चर्चा होताना दिसते. राखी सावंत काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती.
आता राखी सावंत तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीत गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. राखी सावंतने नुकतीच भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या करिअरबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल, एकटेपणाबद्दल, तिच्या बालपणाबद्दल वक्तव्य केले.
याच मुलाखतीत तिने गोविंदा व ट्विंकल खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला जोरू का गुलाम या सिनेमाच्या शूटिंगदरम्याचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की तो संघर्षाचा काळ होता. या सिनेमात तिने खुला है मेरा पिंजरा या गाण्यात गोविंदाबरोबर काम केले होते. या गाण्यात काम करण्याची संधी अचानक मिळाली असे तिने सांगितले.
“मला त्याचे वाईट…”
ती म्हणाली, “मी माझ्या घरातून बाहेर जात होते, त्यावेळी मला गुलाम सिनेमाचे दिग्दर्शक शकिल नुरानी भेटले. त्यांनी मला विचारले की तू डान्स करतेस? मी त्यांना हो म्हणाले. अशा पद्धतीने मला ते आयटम साँग मिळाले.” पुढे शूटिंगचा किस्सा सांगत ती म्हणाली, “मी सकाळी ६ वाजता सेटवर पोहोचले. खूप वेळ वाट पाहिली, कारण- मी गोविंदा सरांची खूप मोठी चाहती होते, त्यानंतर गोविंदाजी आले. मी त्यांना नमस्ते म्हणाले आणि त्यांनी माझ्या तोंडावर ढेकर दिली. ती ढेकर खूप जोरात होती. ते जेवण करून आले असतील, मला त्याचे वाईट वाटले नाही. त्याला मी आशीर्वाद समजला. ” राखी असेही म्हणाली की, निर्मात्यांकडे शूटिंगसाठी कपडे नव्हते, तिला घरातून कपडे आणावे लागले होते.
राखी सावंतचे अनेक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही वेळा ती मजेशीरपणे बोलते तर अनेकदा ती वादग्रस्त वक्तव्ये करते, त्यामुळे अनेकजण तिला ट्रोल करतात. असे असले तरी अनेकजण तिला पाठिंबाही देतात. तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करतात, तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
राखी सावंत बिग बॉस हिंदी व मराठीच्या अनेक पर्वांमध्ये दिसली आहे. ती तिच्या वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता राखी आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
