Rakul Preet Singh on Surpanakha Role : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह या कलाकारांचे लूक पाहायला मिळाले. एकीकडे या भव्यदिव्य ट्रेलरचे कौतुक होत आहे, पण दुसरीकडे मात्र रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी योग्य निवड नसल्याची टीकाही होत आहेत. त्याचबरोबर पात्रांनी परिधान केलेले पोशाख आणि विवेक ओबेरॉयसारख्या कलाकारांची अचानक झालेली एन्ट्री यावरूनही बरीच चर्चा होत आहे. या ट्रेलरमध्ये एक महत्त्वाचा सीन दाखवण्यात आला, तो म्हणजे शूर्पणखाचं नाक कापण्याचा.
रावणाची बहीण ‘शूर्पणखा’च्या भूमिकेत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आहे. ट्रेलरमध्ये तिची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रकुलने ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण आता सांगितलं आहे.
रकुलने शूर्पणखेची भूमिका स्वीकारण्याच्या निर्णयाचं एका चाहत्याने कौतुक केलं. त्याला उत्तर देताना तिने सांगितलं की, या पात्राची भावनिक गुंतागुंत पाहूनच तिने ही भूमिका करायचं ठरवलं. रकुलने लिहिलं, “या सुंदर पत्रासाठी मनापासून आभार. मी शूर्पणखेच्या भूमिकेला होकार दिला, त्यामागे तू उल्लेख केलेलं कारणच होतं-तिच्या आयुष्यातील गुंतागुंत. इतिहास तिला फक्त एका विशिष्ट घटनेसाठीच लक्षात ठेवतो, पण तिच्या कथेत याव्यतिरिक्तही सांगण्यासारखं खूप काही आहे. एक कलाकार म्हणून, लोकांचा दृष्टिकोन बदलणारी आव्हानात्मक पात्रं साकारायला मला आवडतं. त्यामुळे जेव्हा ‘रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तेव्हा लोक या पात्राकडे नवीन दृष्टिकोनाने पाहतील अशी आशा आहे.”
शूर्पणखा कोण होती?
शूर्पणखा ही कैकसी व ऋषी विश्रवा यांची कन्या होती. ती विश्रवा यांची लाडकी मुलगी होती. म्हणूनच त्यांनी तिचं नाव मीनाक्षी ठेवलं होतं. तिची नखे ही चंद्रकोरीप्रमाणे सुंदर अर्धवर्तुळाकार होती. म्हणूनच ती ‘चंद्रनखा’ या नावानेदेखील ओळखली जात होती. कालांतराने तिच्या पतीच्या निधनानंतर ती विद्रूप झाल्याचे संदर्भ कथांमध्ये सापडतात. यात तिची नखे अवास्तव मोठी, सुपासारखी वाढल्याने ‘चंद्रनखा’ ही ‘शूर्पणखा’ म्हणून प्रसिद्ध झाली. शूर्पणखा रावणाची बहीण होती.
पतीच्या मृत्यूनंतर शूर्पणखेने आपला बहुतांश वेळ दक्षिण भारतातील जंगलांमध्ये घालवला. याचदरम्यान, पंचवटीत तिची भेट प्रभू रामाशी झाली आणि ती त्यांच्यावर भाळली. आपल्या मायावी शक्तींचा वापर करून तिने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि श्रीराम यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यांनी तिचा हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर ती लक्ष्मणाकडे गेली, पण लक्ष्मणानेही तिला नकार दिला. या अपमानाने संतापलेल्या शूर्पणखेने सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले. अपमानित झालेल्या शूर्पणखाने तिच्या भावाला, रावणाला सीतेचं अपहरण करण्यास प्रवृत्त केलं आणि या अपहरणातूनच पुढे श्रीराम आणि रावण यांच्यात युद्धाची ठिणगी पडली.
